गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही आणि यशाच्या पूर्णतेत गुरुकिल्ली हा शब्द येतोच. मग ते यश शालेय असो की क्रीडा क्षेत्रातले.. अगदी ऑलिम्पिकमधले.. त्यासाठी गुरु अथवा प्रशिक्षक आवश्यकच असतात. आपल्या शिष्यातले गुण ओळखून त्या गुणांवर आधारित संपूर्ण यश त्याला कसे मिळू शकेल याचा विचार गुरु किंवा प्रशिक्षक सातत्याने करीत असतात. अमुक एका खेळाडूने प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवला असेल तर त्यामागे त्या खेळाडूचा दृढनिश्चय आणि प्रचंड सराव असतो, तसाच त्याच्या प्रशिक्षकांचा वेळोवेळी मिळणारा सल्ला त्याच्या यशावर शिक्कामोर्तब करीत असतो.
प्रत्यक्षात पाहिले तर प्रेक्षकांना खेळाडूचा त्याग, परिश्रम, निराशा इत्यादी दिसत असले तरी त्यांना या खेळाडूंचे गुरु किंवा प्रशिक्षक अभावानेच दिसतात. गुरु अथवा प्रशिक्षक म्हणून घडण्यासाठी सर्वात अगोदर कौशल्यपात्रता आणि ती इतरांना देण्याची इच्छाशक्ती आवश्यक असते. अनेक वर्षांची कौशल्यतपश्चर्या फळाला येते तेव्हा एखादा खेळाडू प्रशिक्षकपदासाठी योग्य ठरतो. परंतु या पदाला पोहोचेपर्यंत अनेक अडथळे त्याला पार करावे लागतात आणि त्यात खेळाडूला झेलाव्या लागणाऱ्या त्याग, परिश्रम, निराशा आणि इतर सगळ्या गोष्टी त्यांना प्रशिक्षकपदासाठी परिपक्व करीत असतात. अनेकवार घेतलेल्या या सगळ्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींच्या अनुभवातून जाताना साहजिकच यशासाठी नेमके काय आवश्यक असते याची त्यांना कल्पना येते आणि ते शिष्याला अथवा खेळाडूला पारंगत करू शकतात.
तंत्र आणि मंत्र या दोन्ही गोष्टी खेळाडूला समजावून सांगताना चिकाटी आणि मनाची शांतता या गोष्टी तयार करून घ्याव्या लागतात. पहिल्याच यशाने हुरळून जाऊ नये आणि पहिल्याच पराभवाने निराशही होऊ नये हे बोलणे किंवा सांगणे सोपे असले तरी ते खेळाडूच्या मनावर ते पक्के बिंबवणे हीच गुरु / प्रशिक्षकाची कसोटी असते. ऑलिम्पिकसारख्या जागतिक पातळीवरील स्पर्धांसाठी तर खेळाडूंना वर्षानुवर्षे सराव करावा लागतो आणि आपले खेळतंत्र विकसित करावे लागते. जगात उपलब्ध असलेले
उत्तमोत्तम कामगिरीचे व्हिडिओ आज यादृष्टीने महत्त्वाचे ठरले आहेत. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये प्रशिक्षक कोणत्या नवीन पद्धती उपयोगात आणत आहेत त्याचाही प्रशिक्षकाला अभ्यास करावा लागतो. हे सर्व झाल्यानंतरही आपला प्रतिस्पर्धी प्रत्यक्ष खेळाच्या वेळी कोणती खेळी खेळतो ती ओळखून क्षणार्धात पलट-खेळी खेळता आली पाहिजे.
ऑलिम्पिकमध्ये खेळाडूची खरी परीक्षा असते. कारण जगातील अनेक देशांमधून निवडक उत्तमोत्तम खेळाडू येथे भाग घेत असतात. त्यांचे प्रशिक्षक सावलीसारखे त्यांच्यामागे असतात आणि त्यांना सूचना देत असतात. पण अखेर प्रशिक्षक हासुद्धा माणूस आहे आणि ताणतणाव, थकवा आणि काही वेळी अपार नैराश्य त्यांच्याही वाट्याला येतेच. जागतिक स्पर्धेत अनेक पदके जिंकणाऱ्या एका प्रगत देशामध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासात असे दिसून आले की स्पर्धेनंतर किमान ४० टक्के प्रशिक्षकांना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जाणवल्या आणि तरीही ६ टक्क्यांपेक्षा कमी प्रशिक्षकांनी त्यासाठी आरोग्य सल्ला घेतला.
“विपरीत विचार” नावाची एक संकल्पना नुकतीच पुढे आली आहे. यात ‘काय झाले असते?’ यावर माणूस नेहमी भर देतो असे मानतात. ऑलिम्पिकचेच उदाहरण देताना असे म्हटले आहे की, ‘ज्याना ब्राँझ पदक मिळते ते रौप्य पदक विजेत्यापेक्षा अधिक आनंदात असतात’. याचे कारण असे दिसले की, ब्राँझ पदक विजेते केवळ पदक मिळाले म्हाणून आनंदात असतात तर रौप्य पदक विजेत्यांचे लक्ष ‘जवळजवळ’ सुवर्णपदक मिळवण्यावर केंद्रित असते. प्रशिक्षकाला योग्य मानसन्मान मिळाला तर देशाला अधिक चांगले यश मिळू शकेल असेच तर या वर्षीचे ऑलिम्पिक सांगत नसेल ना?