स्पेनचा महान डावखुरा ३८ वर्षीय टेनिसपटू राफेल नादालने दोन दशके टेनिस कोर्टवर अनभिक्षित सम्राटाप्रमाणे राज्य केल्यानंतर वाढते वय आणि दुखापतीमुळे अखेर आपली टेनिस रॅकेट म्यान केली. आपल्या जबरदस्त आक्रमक खेळाची मोहोर नादालने टेनिस कोर्टवर उमटवून साऱ्या टेनिसविश्वाला आपल्या खेळाची भूरळ पाडली होती. क्ले कोर्टवर सर्वाधिक जेतेपदं पटकावून नादालने “ना भूतो ना भविष्यती” असा आगळा विक्रम करून ठेवला आहे जो भविष्यात मोडला जाणे कठीणच आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण १२ विविध स्पर्धांत जेतेपदं पटकावली. त्यामधील तब्बल ४० विजेतेपदं क्ले कोर्टवर मिळवली. क्ले कोर्टवर सलग ८१ सामने नादालने जिंकले. क्ले कोर्टवर खेळली जाणारी टेनिस विश्वातील प्रतिष्ठेची फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा नादालने विक्रमी १४ वेळा जिंकली आहे. टेनिस जगतात होणाऱ्या ४ ग्रँडस्लॅम स्पर्धांत एकाच स्पर्धेत जास्तीतजास्त अजिंक्यपद नादालने पटकावली आहेत. सलग ११ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा नादाल एकमेव टेनिसपटू आहे. तीन वेगवेगळ्या दशकात फ्रेंच स्पर्धा जिंकण्याचा हा आगळा पराक्रम नादालने केला आहे.
क्ले कोर्टवर नादालला सर्वाधिक यश लाभले खरे, पण याच क्ले कोर्टवरील ताकदवान खेळामुळे नादालला नंतर दुखापतींना समोरे जावे लागले. क्ले कोर्ट टेनिसपटूच्या फिटनेसची पुरेपूर परिक्षा घेते. या कोर्टवर चेंडू संथ गतीने येत असल्यामुळे तो परतवण्यासाठी दुप्पट ताकद लागते. चेंडू हातभर वळूनदेखील तुमच्याकडे येतो. त्यामुळे डोळे, हात, मनगट, पायांच्या हालचाली या सर्वांचा मेळ योग्यप्रमाणे बसवावा लागतो. क्ले कोर्टवरील सफाईदार खेळ, शानदार फोरहँड, बॅकहँडचे फटके आणि या सर्वाला ताकदीची दिलेली साथ यामुळे टेनिस जगतात “पॉवर गेम”साठीच नादालने आपला परिचय करून दिला.
स्पेनमध्ये टेनिस हा खेळ फारसा लोकप्रिय नव्हता. स्पेनची ओळख होती ती बुलफाइट, फुटबॉल आणि टोमॅटो महोत्सवासाठी. परंतु नादालने या खेळात मिळवलेल्या जबरदस्त यशानंतर अनेक युवा चांगले टेनिसपटू आता स्पेनमध्ये तयार झाले आहेत. आताचे ताजे उदाहरण म्हणजे त्यांचा युवा टेनिसपटू अल्कराझ नादालची जागा घेण्यास सज्ज झाला आहे. नादालप्रमाणेच अल्कराझदेखील डावखुरा असून त्याने ४-५ वर्षांच्या छोट्या कालावधीत चांगले यश संपादन केले आहे. विम्बल्डन, अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम अल्कराझने केला आहे.
स्पेनसारख्या छोट्या देशाला टेनिसविश्वात राफेलने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. २००५मध्ये त्याने वयाच्या १९व्या वर्षी पहिली फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली. त्यानंतर २ दशके राफेलने मागे वळून बघितलेच नाही. आपली विजयी दौड कायम राखली. हाच नादाल पुढे एकूण ९२ स्पर्धा जिंकेल असे त्यावेळी फारसे कुणाला टेनिसविश्वात वाटले नव्हते. वयाच्या चौथ्या वर्षी पहिल्यांदा त्याने टेनिसची रॅकेट हातात धरली. वडिलांना फारशी खेळाची आवड नव्हती. परंतु त्याच्या काकांना मात्र टेनिसची प्रचंड आवड होती. कडव्या शिस्तीच्या टोनी काकांनी राफेलला सुरुवातीच्या काळात या खेळाचे धडे दिले. काकांच्या मार्गदर्शनामुळेच टेनिसविश्वाला राफेल नादाल नावाचा हिरा सापडला. सुरुवातीला उजव्या हाताने खेळणाऱ्या राफेलला नंतर डाव्या हाताने खेळण्याची सूचना त्याच्या काकांनीच केली. कारण डावखुऱ्या खेळाडूंना खेळताना नैसर्गिक फायदा होतो असे काकांचे मत होते. त्याची अंमलबजावणी राफेलने तंतोतंत केली. मग त्याचाच फायदा नादालला आपली झळाळती कारकीर्द घडवण्यात उपयुक्त ठरली. २००१मध्ये १४ वर्षे ३ महिन्यांचा असताना नादालने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पदार्पण केले. २००२मध्ये १५ वर्षे १० महिन्यांचा असताना तो पहिला एटीपी सामना खेळला. २००३च्या विम्बल्डन स्पर्धेत तिसरी फेरी गाठणारा तो सर्वात युवा टेनिसपटू ठरला.
पुढल्याच वर्षी याच स्पर्धेत त्याने रॉजर फेडररला पराभूत करून टेनिसविश्वात खळबळ माजवली. २००५मध्ये त्याने आपले पहिले फ्रेंच स्पर्धेतील जेतेपद मिळविले. २००८च्या बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेत नादाल सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. प्रतिष्ठेच्या सांघिक डेविस चषक स्पर्धेत नादालने स्पेनला तब्बल ५ वेळा ही स्पर्धा जिंकून दिली. नादाल, फेडरर, जोकोविच या तिघांभोवतीच २ दशके सारे टेनिसविश्व फिरत होते. त्यामध्ये त्यांच्या काही अविस्मरणीय टेनिस लढतींनी टेनिसप्रेमींवर गारुड केले. जोकोविच, नादाल या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये अनेक संस्मरणीय लढती झाल्या. त्या लढती म्हणजे टेनिस चाहत्यांसाठी जणूकाही मेजवानीच असायची. तब्बल ६० आंतरराष्ट्रीय सामने या दोघांमध्ये झाले ज्यामध्ये जोकोविचने ३१ आणि नादालने २९ सामने जिंकले. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासात फेडरर, जोकोविच यांच्यापेक्षा सर्वांत कमी सामन्यांमध्ये नादाल पराभूत झाला. फेडरर ६० तर जोकोविच ५१ सामन्यांत पराभूत झाला. नादालला ४४ लढतीत हार खावी लागली.
जागतिक टेनिस क्रमवारीत अब्बल १० खेळाडूंमध्ये आपले स्थान तब्बल ११२ आठवडे राखून नादालने आणखी एक विक्रम आपल्या नावे लावला आहे. आपल्या कारकीर्दीत ३० स्पर्धा जिंकताना नादालने एकही सेट न गमवण्याचा अनोखा पराक्रम केला. नादालच्या कारकीर्दीत अनेक रंगतदार सामन्याची मेजवानी टेनिस चाहत्यांना मिळाली. २००८च्या विम्बल्डन स्पर्धेत निर्णायक लढतीत तब्बल ५ तास रंगलेल्या सामन्यात पहिले २ सेट गमावूनदेखील रॉजर फेडररला नमविण्याचा पराक्रम करून आपले पहिले विम्बल्डन जिंकण्यात नादाल यशस्वी ठरला. २००६-२००७च्या या स्पर्धेत रॉजरकडून नादाल पराभूत झाला होता. अखेर त्याचा बदला घेण्यात नादाल यशस्वी ठरला. २०२२च्या ऑस्ट्रेलियन स्पर्धेत नादाल आणि मेदवेदेव यांच्यातील अंतिम लढत तब्बल साडेपाच तास रंगली. पहिले २ सेट गमावूनदेखील नादालने बाजी मारून तब्बल १३ वर्षानंतर पुन्हा ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. बहुदा त्याच्या कारकीर्दितील हे दोन सर्वोत्तम सामने असतील असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सध्याच्या घडीला २ हजार कोटींपेक्षा जास्त मालमत्तेचा तो धनी आहे. त्याने रियल इस्टेट आणि हॉटेल व्यवसायात मोठी गुंतवणूक केली. स्पेन आणि मेक्सिकोत नादालने स्वतःच्या टेनिस अॅकॅडमी सुरू केल्या. नायकी, क्रिया, एम्पारियो, आरमानी, हिल फिगर, एक्स टेल, बाबलोट या जगातील काही अग्रगण्य कंपन्यांसोबत त्यांनी करार केला आहे. सौदी अरेबियाच्या टेनिस असोसिएशनचा तो ब्रँड अॅम्बेसेडर आहे. २०१३मध्ये त्याने स्वतःचे विमान घेतले. टोनी नादाल, फ्रांसिस्को रोईंगो, कार्लोस मोया, मार्क लोपेझ या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नादाल तालावूनसुखावून एक उत्तम खेळाडू म्हणून तयार झाला. मानाचा एडबर्ग पुरस्कार नादालला ५ वेळा मिळाला. लॉरियर्स वर्ल्ड स्पोर्ट्समन पुरस्काराने त्याला दोनदा गौरविण्यात आले. जगप्रसिद्ध टाइम मासिकाने २०२२ साली प्रसिद्ध केलेल्या अंकात जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये नादालचा समावेश केला होता.
तो फुटबॉलचा प्रचंड चाहता असून रिगल माद्रिद क्लबचा तो गोठा फॅन आहे. पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो त्याचा आवडता खेळाडू असून त्याने त्याच्या बऱ्याच सामन्यांना हजेरी लावली आहे. भविष्यात स्पेनमधील बलाढ्य रियल माद्रिद फुटबॉल क्लबच्या अध्यक्षपदाची सूत्रे नादालला हाती घ्यायची आहेत. फुटबॉल खेळासाठीदेखील नादालला योगदान द्यायचे आहे. एवढे यश संपादन करूनदेखील नादालचे पाय जमिनीवरच होते. त्यामुळे टेनिस कोर्टच्या बाहेर एक उत्तम नागरिक म्हणूनदेखील त्यानी लौकिक मिळवला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तो टेनिसचा अनभिक्षिक्त सम्राटच होता. गेली २ वर्षं नादाल दुखापतींचा मुकाबला करत होता. आता वाढत्या वयामुळे आणि दुखापतींनी त्रस्त असल्यामुळे अखेर त्याने आपल्या शानदार कारकिर्दीला विराम द्यायचा निर्णय घेतल्यामुळे जगभरातील त्याच्या चाहत्यांना त्याचा तो निर्णय पचवणे जडच गेले असणार यात शंका नाही. जोपर्यंत पृथ्वीतलावर टेनिस खेळ असेल तोपर्यंत नादालचे नाव त्यापासून कधीच वेगळे करता येणार नाही. स्पेनच्या टेनिस इतिहासात नादालच्या कामगिरीची नोंद नक्कीच सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. एक मात्र नक्की. टेनिस जगतात दुसरा नादाल होणे नाही.
राफाला त्रिवार वंदन! अगदी खरंय, दुसरा नदाल होणे कठिणच परंतु अल्कराझ याच्या रूपाने दुसरा विजेतेपदात सातत्य राखणारा टेनिसपटू टेनिस जगताला मिळावा हिच सदिच्छा !