Saturday, June 22, 2024
Homeटॉप स्टोरीअजितदादांच्या ‘आजारा’वर इलाज...

अजितदादांच्या ‘आजारा’वर इलाज शोधताना छगन भुजबळ उपेक्षित!

राज्य सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजारपणावर अखेर दिल्लीदरबारी इलाज सापडला. काल आपली नित्याची कामे अर्धवट सोडून काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांच्या ‘आजारपणा’वर अखेर उपाय शोधला. आज मुंबईत परतताच मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री देतानाच त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहा सहकाऱ्यांनाही पालकमंत्रीपद सोपवले. या सर्व घडामोडीत भारतीय जनता पार्टीचे वजनदार नेते चंद्रकांतदादा पाटील यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले तर अजितदादांपाठोपाठ राष्ट्रवादीतले दुसरे वजनदार नेते छगन भुजबळ यांना मात्र सध्यातरी हात चोळत बसावे लागले आहे.

राज्य सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडच्या काळात वारंवार ‘आजारी’ पडत असल्याने त्यांच्या ‘आजारपणा’वर जालीम इलाज करण्याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल तातडीने राजधानी नवी दिल्लीला रवाना झाले. तेथे त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन सुमारे दोन तास चर्चा केली. या चर्चेनंतर मुंबईत परतताच आज मुख्यमंत्र्यांनी १२ मंत्र्यांकडील पालकमंत्रीपदाची जबाबदारी निश्चित केली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांचा समावेश आहे. मात्र, नाशिकसाठी आग्रही असलेले छगन भुजबळ तसेच रायगडसाठी आग्रही राहिलेल्या अदिती तटकरे यांच्याकडे कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले नाही.

अजित

राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेतील भाजपा तसेच शिवसेना यांनी विविध जिल्ह्यांची पालकमंत्रीपदे वाटून घेतली होती. त्यातच सत्ते राष्ट्रवादी दाखल झाली. त्यामुळे आधीच्या दोन्ही पक्षांनी त्यांच्याकडील काही पालकमंत्रीपदे सोडली आणि ती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे गेली. भाजपाने त्यांच्या कोट्यातली चार तर शिवसेनेने त्यांच्याकडील तीन पालकमंत्रीपदे राष्ट्रवादीला दिली. यात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याकडे असलेल्या अमरावती, वर्धा, अकोला आणि भंडारा, या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोडले. आता त्यांच्याकडे फक्त नागपूर आणि गडचिरोलीचे पालकमंत्रीपद आहे. त्यांनी सोडलेल्या चार पालकमंत्रीपदांपैकी एकही पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेलेले नाही. ही सर्व पालकमंत्रीपदे भाजपाने स्वतःकडेच राखली आहेत. फक्त जबाबदारी बदलली आहे.

पालकमंत्रीपदाची नवी जबाबदारी निश्चित करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर चंद्रकांतदादांकडे फडणवीस यांच्याकडील अमरावती जिल्हा सोपविण्यात आला आहे. विखे पाटील यांच्याकडे अहमदनगरबरोबरच आता फडणवीस यांच्याकडील अकोल्याचे पालकमंत्रीपदही सोपविण्यात आले आहे. चंद्रकांतदादांकडील पुण्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे चंद्रपूरचे पालकमंत्रीपद कायम ठेवताना त्यांच्याकडे असलेले गोंदियाचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या संजय बनसोडेंकडे सोपविण्यात आले आहे. त्याऐवजी फडणवीस यांच्याकडे असलेले वर्ध्याचे पालकमंत्रीपद मुनगंटीवार यांना देण्यात आले आहे.

अजित

डॉ. विजयकुमार यांच्याकडे असलेले नंदुरबारचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांच्याकडे देण्यात आले असून त्याऐवजी त्यांना फडणवीस यांच्याकडे असलेले भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. भाजपाचे अतुल सावे यांच्याकडील जालन्याचे पालकमंत्रीपद कायम ठेवत त्यांच्याकडील बीडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद कायम राखताना त्यांच्याकडील बुलढाण्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. शिवसेनेच्याच तानाजी सावंत यांच्याकडील धाराशिवचे पालकमंत्रीपद कायम ठेवत त्यांच्याकडील परभणीचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. शिवसेनेचेच दीपक केसरकर यांच्याकडील मुंबई शहराचे पालकमंत्रीपद कायम ठेवत त्यांच्याकडील कोल्हापूरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे.

१२ जिल्ह्यांचे नवे पालकमंत्री पुढीलप्रमाणे:-

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे-पाटील

सोलापूर व अमरावती- चंद्रकांत पाटील

भंडारा- डॉ. विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मराव आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदुरबार- अनिल पाटील

वर्धा- सुधीर मुनगंटीवार

Continue reading

न्यूयॉर्कनंतर १०० किलोमीटर जलबोगदे असणारे शहर म्हणजे मुंबई

मुंबईतल्या अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम 'टीबीएम' संयंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांतर्गत वडाळा ते परळदरम्यान ५.२५ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याच्या जलबोगद्याचा 'ब्रेक थ्रू' आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक...

देशातल्या 8 लोकसभा मतदारसंघांच्या काही मतांची होणार पडताळणी

भारत निवडणूक आयोगाने 1 जून 2024 रोजी जारी केलेल्या मानक कार्यप्रणालीच्या अनुषंगाने, नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर, ईव्हीएमची बर्न्ट मेमरी/मायक्रोकंट्रोलर तपासणी/पडताळणीसाठी अनुक्रमे 8 आणि 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा तपशील पुढीलप्रमाणे: लोकसभा आम चुनाव 2024ईवीएम जांच...

कायद्याच्या पदवीधरांना करिअरच्या अनेक संधी

कोणत्याही क्षेत्रात कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागले, की सर्वांना गरज पडते ती वकिलांची! खासगी असू दे किंवा सार्वजनिक क्षेत्र; प्रत्येक क्षेत्रात केव्हा ना केव्हा वकिलांची आवश्यकता भासत असतेच. फक्त कंपन्या किंवा सरकारी कार्यालयेच नाही तर वैयक्तिक पातळीवरही कायदेशीर अडचणी...
error: Content is protected !!