लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्याविरोधात झाले आहे याची जाणिव झाल्याने भारतीय जनत पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपने आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रात दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतिक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
अतुल लोंढे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काल राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार केली. यावेळी माध्यमांशी बोलताना लोंढे म्हणाले की, पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्याविरोधात झाले आहे याची जाणिव झाल्याने पंतप्रधान मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. एका आघाडीच्या दैनिकात पहिल्या पानावर तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे भारतात की पाकिस्तानात अशी जाहिरात दिली आहे. हा मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे.

भारतीय जनता पक्षाला भारत आणि पाकिस्तानमधला फरक कळत नाही का? पंतप्रधान हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त झाले आहेत. १० वर्षांत जनतेच्या हिताचे काही केले नाही. त्यामुळे मतं मागण्यासाठी त्यांना पाकिस्तानचा आधार घ्यावा लागत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्यानी खाणारा, पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयला पठाणकोट येथे बोलावणारा पंतप्रधान पाहिजे की, चीनसमोर निधड्या छातीने उभा राहणारा, मणिपूरमध्ये जाऊन पीडितांचे सांत्वन करणारा, कन्याकुमारी ते श्रीनगर अशी पायी भारत जोडो यात्रा काढणारा पंतप्रधान पाहिजे, अशी जाहिरात आम्हीही देऊ शकतो. पण आमच्याकडे कार्यक्रम आहे. त्यामुळे आम्हाला अशी गोष्टींची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.
भारताच्या लोकसभेची निवडणूक सुरु आहे. देशातील विविध राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानातील राजकीय पक्ष ही निवडणूक लढवत नाहीत. मग देशातील जनतेने कोणत्याही पक्षाला मतदान केले तरी भारतातलाच एक पक्ष विजयी होणार आहे. भारताचे सरकार बनणार आहे. याच्याशी पाकिस्तानचा संबंध काय? पण भाजप आणि पंतप्रधान वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. हा आदर्श आचारसंहितेचा भंग तर आहेच, त्यासोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 171(G), लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 125, 153(A), 123 (3A)नुसार गुन्हा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे व भाजपसोबत ही जाहिरात देणारे त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी लोंढे यांनी केली.
या शिष्टमंडळात लोंढे यांच्यासोबत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या विधि विभागाचे अध्यक्ष एड. रवी जाधव, गजानन देसाई यांचा समावेश होता.