राज्यातल्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, अनेक भागात निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती, ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, यासारख्या गंभीर विषयांवर चर्चा करण्याकरीता तातडीने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आज राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे करण्यात आली.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनभर भेट घेऊन निवेदन दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, डॉ. नितीन राऊत, राजेश टोपे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आ. वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, प्रणिती शिंदे, उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, सुनील प्रभू आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मराठा समाजात असंतोषाची भावना असून त्याचा कधीही उद्रेक होईल अशी स्फोटक परिस्थिती आहे. नेत्यांना मतदारसंघात फिरणे अवघड झाले आहे. कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून मराठा समाजातील तरूण आत्महत्त्या करत आहेत. राज्यपाल केंद्र आणि राज्य सरकारमधील दुवा आहेत. त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशी आरक्षणाच्या विषयावर बोलावे तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलून त्यांनाही आश्वस्त करावे. जरांगे पाटील यांची तब्येत प्रचंड खालावलेली आहे. अघटीत घडू नये यासाठी मध्यस्थी करा व प्रश्न सोडवा अशी विनंती आम्ही केली आहे.
सरकार सकारात्मक तोडगा काढणार असेल तर आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेऊन सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु सरकारमधील घटक पक्षच एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. तिघांनी सामूहिक जबाबदारी घेतील पाहिजे. या सरकारमधील लोक खोटे बोलण्यात पटाईत असल्याने राज्य सरकारवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. म्हणून विशेष अधिवेशनापूर्वी आरक्षणाच्या कायद्याचा मसुदा सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यात दुष्काळ आणि शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सप्टेंबर महिन्यापासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असून यात दररोज वाढ होत आहे. कमी पावसामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांतील खरीप पिके गेली आहेत तर रब्बी हंगामाची स्थितीही फारशी चांगली नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. दिवाळीचा सण आठ-दहा दिवसांवर आला आहे आणि शेतकऱ्याचे हात मात्र रिकामे आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी उजळून निघाली पाहिजे त्यासाठी राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करुन तातडीने मदत दिली पाहिजे, असेही ते म्हणाले.
राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे. मोठ्या प्रामणात अंमली पदार्थांचे साठे सापडले असून तरुण पिढीमध्ये हे विष पसरवून त्यांना बरबाद करण्याचे काम करणाऱ्यांवर जरब बसली पाहिजे. याप्रकरणी ड्रग माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त करणे गरजेचे आहे. महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. बेरोजगारीचा प्रश्नही मोठा आहे. आरोग्य सेवा कोलमडलेली असून शासकीय रुग्णालयात नवजात बालकांसह मोठ्या प्रमाणात रुग्णांचे मृत्यू झाल्याची घटना आरोग्य सेवेचे धिंडवडे काढणारी आहे, असे नाना पटोले म्हणाले.