चित्रपटांमध्ये सीमा ओलांडण्याची, सामूहिक मानवी अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि मानवी भावनांच्या वैश्विक भाषेद्वारे एकमेकांशी जोडण्याची विलक्षण शक्ती असते, ही एक व्यापकपणे स्वीकारलेले प्रतिमान आहे. गोवा येथे आयोजित 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (IFFI) “कॅचिंग डस्ट” या चित्रपटाने प्रारंभ झाला, या चित्रपटाने हीच भावना कायम ठेवत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चित्रपटाच्या आकर्षक कथानकाने अनोख्या दृश्य कलात्मकतेसह, चित्रपटाचा एक विलक्षण प्रवास दाखवला.
या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी खचाखच भरलेल्या सिनेमागृहात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री, डॉ एल मुरुगन यांनी चित्रपटातील कलाकार आणि पडद्यामागील कलाकारांचा सत्कार केला.
स्टुअर्ट गॅट दिग्दर्शित, या चित्रपटात एरिन मोरियार्टी, जय कोर्टनी, दिना शिहाबी, रायन कॉर, जोसे अल्टिट, गॅरी फॅनिन आणि ओल्वेन फ्युरे या कलाकारांचा समावेश आहे. मिश्र आशियाई संस्कृतीचा वारसा लाभलेले दिग्दर्शक स्टुअर्ट गॅट हे पुरस्कार-विजेते ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आहेत. ज्यांच्या चित्रपटाचे कथानक बर्याचदा सामाजिक विषयांवर प्रभाव टाकणारे असते.
चित्रपटाचे कथानक: 96 मिनिटांचा हा चित्रपट टेक्सासच्या बिग बेंडच्या दुर्गम वाळवंटातील नाट्य आहे. यात एकाकी आणि दबून जगणारी जीना आणि तिचा गुन्हेगार नवरा क्लॉइड काहीसे अनिच्छेने एकमेकांसोबत या वाळवंटात राहात असतात. पतीच्या वर्तनामुळे वैतागलेली जीना निघून जाण्याचा निर्णय घेते, तेव्हा अचानक न्यूयॉर्कमधून एक दाम्पत्य तेथे येते. या दांपत्याच्या तिथल्या उपस्थितीमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांना तिथे राहू देण्यासाठी क्लॉइडला पटवून देते. ज्याचे सर्वांसाठी धोकादायक परिणाम होतील असा हा निर्णय असतो. स्पष्ट निराशा आणि हताश मानसिकतेचा सामना करताना निराशेच्या पलीकडील समाधान शोधण्याच्या खोलवरच्या पातळीवर हा चित्रपट प्रेक्षकांना मोहित करतो.