Homeटॉप स्टोरीनागपूरच्या हिवाळी अधिवेशनात...

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात होणार धानाला बोनस जाहीर

भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करते आहे. त्यामुळे नागपूर येथे होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनात धानाला बोनस जाहीर करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडाऱ्यात केली.

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदान, भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरातून उपस्थित हजारो लाभार्थ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॅा. विजयकुमार गावित, खा. सुनील मेंढे, आ. नरेंद्र भोंडेकर, आ. राजू कारेमोरे, माजी मंत्री परिणय फुके, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार नानाभाऊ पंचबुद्धे, चरण वाघमारे, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलिस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.

धान हे जिल्ह्यातील प्रमुख पिक आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धानाला बोनस जाहीर करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केली होती. त्यानुसार येत्या नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धान जलदगतीने खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी सद्या सुरू असलेली खरेदी केंद्रे पुरेशी नसल्याने उर्वरीत केंद्र सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

सद्या शेतकऱ्यांच्या पिकांचा ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता यावी, यासाठी भंडारा जिल्ह्यात पिक पाहणीच्या कार्यक्रमास दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणादेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. समृद्धी महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोलीपर्यंत आपण वाढवित आहे. या मार्गाच्या डीपीआरचे काम गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ – देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच आपण मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली. येत्या काही दिवसात कृषि फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

भंडारा जिल्ह्यात अंभोरा येथे 352 कोटी रुपयांचा  जल पर्यटन प्रकल्प आपण राबवितो आहे. याप्रकल्पामुळे जिल्ह्याच्या पर्यटनासह रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. गोसेखुर्द राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. केंद्र शासनानेदेखील या प्रकल्पाला निधी उपलब्ध करून दिला आहे. 2024च्या शेवटपर्यंत या प्रकल्पाचे काम पुर्ण करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देऊ, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. 

एक हजार 954 कोटींच्या अग्रीमाचे वाटप – अजित पवार

यावर्षीपासून आपण महत्वाकांक्षी सर्वसमावेशक पिकविमा योजना सुरू केली. योजनेंतर्गत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यभर अग्रीम रक्कमेचे वाटप केले जात आहे. नुकसानभरपाईसाठी 47 लाख 63 हजार अर्जांना मंजूरी देण्यात आली असून आतापर्यंत 965 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी यावर्षी पहिल्यांदाच 1 कोटी 71 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शुन्य टक्के व्याजाने पिककर्ज, पुरग्रस्तांना दुप्पटीने आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भंडारा जिल्ह्यात धान पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. शेतकऱ्यांनी धानासोबतच नगदी पिकेदेखील घेतली पाहिजे. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी होती, ती पुर्ण करण्यात आली आहे. लवकरच निविदा काढून महाविद्यालयाचे बांधकाम सुरू केले जातील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

Continue reading

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा माल जप्त!

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटींहून अधिक किंमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतल्या झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये पहिल्या प्रकरणात 9.662 किलोग्रॅम...

‘अभिजात साहित्याचे अक्षरविश्व’ प्रकाशित

सुप्रसिद्ध साहित्यिक राजीव श्रीखंडे लिखित आणि ग्रंथालीच्या वतीने प्रकाशित 'अभिजात साहित्याचे अक्षरविश्व', या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, विजय कुवळेकर, संजीवनी खेर आणि दिनकर गांगल यांच्या हस्ते मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात नुकतेच झाले. या पुस्तकात १५३२ ते २००१ या कालावधील जगभरातील साहित्यकृतींचा...

मुंबईत पालिकांच्या शाळेत गणित, इंग्रजीसाठी स्मार्ट तंत्रज्ञान

मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना गणित आणि इंग्रजी यासारख्या विषयाची गोडी लागावी तसेच विषयाच्या संकल्पना सोप्या पद्धतीने समजून घेणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्‍या शिक्षण विभाग आणि संपर्क फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपर्क स्मार्ट शाळा शिक्षक प्रशिक्षण आयोजित करण्यात...
Skip to content