भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान ‘राजगृह’ यासह आवश्यक त्या सर्व ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाइल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यंदा महिला व नवजात बालकांकरीता चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारेदेखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान व चैत्यभूमी इत्यादी ठिकाणी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन व अंमलबजावणी ही प्रामुख्याने पालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाद्वारे करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देताना ‘जी उत्तर’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या अनुयायांना विश्रांतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय म्हणून सदर परिसरातील पालिकेच्या सहा शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्येदेखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. या वर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन ०५ डिसेंबर, २०२३ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊलखुणा’ ही यंदाच्या पुस्तिकेची मध्यवर्ती संकल्पना असून त्यामध्ये बाबासाहेबांचे वास्तव्य, कार्य आदींचा संदर्भ असलेल्या देशांमध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्यांचे छायाचित्र आणि माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.
महापालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी, दादर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे.
• चैत्यभूमी येथे शामियाना व व्ही.आय.पी. कक्षासह नियंत्रण कक्षाची व्यवस्था. नियंत्रण कक्षाशेजारी, तोरणा प्रवेशद्वाराजवळ व सूर्यवंशी सभागृह मार्गासह विविध ११ ठिकाणी रुग्णवाहिकेसहीत आरोग्यसेवा.
• १ लाख चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपात तात्पुरता निवारा.
• छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व परिसरात पुरेशा संख्येतील फिरती शौचालये.
• रांगेत असणाऱ्या अनुयायांसाठी पुरेशा संख्येतील फिरती शौचालये. पिण्याच्या पाण्याच्या नळाची व्यवस्था.
• पिण्याचे पाणी असणाऱ्या टँकर्सची व्यवस्था. संपूर्ण परिसरात विद्युतव्यवस्था.
• अग्निशमन दलामार्फत आवश्यक ती सेवा.
• चौपाटीवर सुरक्षारक्षकासहीत बोटीची संपूर्ण परिसरात व्यवस्था.
• चैत्यभूमी स्मारकातील आदरांजली कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण.
• फेसबुक, ट्विटर, यूट्यूब या समाजमाध्यमांवर असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत खात्याद्वारे ६ डिसेंबर रोजी थेट प्रक्षेपणाची व्यवस्था.
• विचारप्रवर्तक पुस्तकांसह वैविध्यपूर्ण बाबींच्या विक्रीसाठी स्टॉल्सची रचना.
• दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ आणि एफ उत्तर विभाग, चैत्यभूमी व छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर (पूर्व) स्वाामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष.
• राजगृह येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष.
•स्काऊट गाईड हॉल येथे भिक्खू निवासाची व्यवस्था.
• मैदानात धुळीचा त्रास रोखण्यासाठी पायवाटेवर आच्छादनाची व्यवस्था.
• अनुयायांना मार्गदर्शनाकरीता १०० फूट उंचीवर स्थळ निदर्शक फुग्याची व्यवस्था.
• मोबाईल चार्जिंगकरीता शिवाजी पार्क येथे पॉइंटची व्यवस्था.
• फायबरच्या तात्पुरत्या स्थानगृहाची व तात्पुरत्या शौचालयांची पुरेशा संख्येने व्यवस्था.
• रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व बसण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था.
• छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) व्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वडाळा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथेदेखील तात्पु्रत्या निवाऱ्यांसह पुरेशा संख्येने फिरती शौचालये.
• स्नानगृहे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
• महिला व नवजात बालकांकरीता चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क येथे हिरकणी कक्षाची सुविधा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व अनुयायांना नागरी सेवासुविधा देण्यासाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. अनुयायांनी या सेवासुविधांचा लाभ घ्यावा. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल इत्यादींद्वारे देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी यानिमित्ताने आवर्जून केले आहे.