Thursday, November 7, 2024
Homeहेल्थ इज वेल्थकळावे, कोरोना प्रादुर्भाव...

कळावे, कोरोना प्रादुर्भाव पाहता..

कोरोनाचा कहर कमी होताच पुन्हा एकदा लग्नसराई मोठया जोमात सुरू झाली आहे. हळदी, साखरपुडा, लग्नसमारंभांची लगबग पुन्हा एकदा सर्वच समाजात दिसू लागलेली आहे. मात्र हे करत असताना कोरोनाचा संसर्ग अजून संपलेला नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने गेल्या तीन-चार महिन्यांत अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील लग्नसमारंभ अत्यन्त साधेपणाने साजरे करत नियमांचे पालन केले आहे. त्याचबरोबर लग्नसराईत होत असलेल्या वारेमाप खर्चालादेखील आळा घालण्याचे काम कोरोना काळात प्रकर्षाने दिसून आले आहे. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरे झालेले लग्नसमारंभ आमंत्रण पत्रिकेपासून ते जेवणावळयापर्यंतच्या सर्वच खर्चावर नियंत्रण ठेवणारे ठरले. त्यामुळे कोरोनाने घडवलेला हा सकारात्मक बदल यापुढील काळातदेखील आपण अंगीकारायला हवा जेणेकरून नाहक प्रतिष्ठेपायी आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी व उद्ध्वस्त होणारी अनेक कुटुंबे नक्कीच वाचतील.

विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारामध्ये करण्याची वेळ आलेली आहे. महागाई वाढली, उत्पन्न घटले, नोकऱ्यांमध्ये शाश्वती नाही, आर्थिक डोलारा कोलमडत चाललाय, कुटुंबे विभागली. त्यामुळे कुटुंबांमध्ये आर्थिक समतोल नाही. अशा परिस्थितीत केवळ दुसऱ्याने केला म्हणून व समाजाला दाखवण्यासाठी भव्य लग्नसमारंभांचा घाट घातला जात असेल तर तो निव्वळ हास्यास्पद आहे. कितीही मोठा समारंभ केला तरी लोक काही दिवसांनी विसरून जातात. लग्नपत्रिकांवरील भरमसाठ खर्च व त्या वाटताना प्रवासात जाणारे नवरदेव व त्याच्या नातलगांचे जीव याची काहीच किंमत नाही का? यावर अंकुश आणत सोशल मीडिया व फोनसारख्या माध्यमांचा वापर अमंत्रणासाठी करायला काय हरकत आहे! आज लग्नामध्ये मुलीच्याइतकाच खर्च मुलालाही येतो. त्यामुळे जुनाट मानसिकता बदलून समाजपरिवर्तनाची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. नोकरदार व शेतकरीवर्ग मुलांच्या लग्नाच्या खर्चापायी सतत चिंतेत दिसतो तर दुसरीकडे व्यापारीवर्ग आपल्या मुलांचे लग्न मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत उरकून व्यवसायवृद्धीकडे अधिक लक्ष केंद्रित करू लागलाय. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतलाच पाहिजे.

वधु-वरांच्या कपड्यांवर होणारा खर्च तर निरर्थक असून केवळ लग्नापुरते वापरल्या जाणाऱ्या कपड्यांवर हजारो रुपयांची उधळपट्टी अनाकलनीय आहे. त्यापेक्षा नेहमी वापरता येण्यासारखे कपडे लग्नात घेणे किफायतशीर आहे. जेवणावळी, मानपान यावरील खर्च कमी करून वधु-वरांच्या भावी संसार व प्रगतीला हातभार लावला पाहिजे. हळदीसारख्या कौटुंबिक सोहळ्यातील गर्दी टाळली पाहिजे. मोजक्या लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो. कोरोनामुळे सर्व व्यावसायिकांनी त्यांचे भाव वाढवले आहेत. आपण मात्र बदल स्वीकारायला तयार नाही. आजची बचत उद्याची निर्मिती आहे. त्यामुळे बचतीला प्राधान्य दिले पाहिजे. इतर जाती-धर्मांतील चांगल्या गोष्टींचा, चालीरितींचा स्वीकार केलाच पाहिजे. आज कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती एक संधी समजून समाज सुधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. सरकारी कायदे होतील, मग आपण बदलू ही मानसिकता म्हणजे पोकळ आशावाद आहे. आपले निर्णय आपणच घेतले पाहिजेत.

आपण, आपले कुटूंब, आपला समाज उद्या प्रगत, सुसंस्कृत व सधन बनवायचा असेल तर लग्नकार्यातील अनावश्यक होणारी वारेमाप उधळण थांबवलीच पाहिजे. यासाठी समाजातील उच्चमध्यम व मध्यमवर्गीय यांना महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आज प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात उदरनिर्वाहापेक्षा जास्त चिंता असते ती म्हणजे मुलाबाळांच्या लग्नाची. ही चिंता मिटवण्याचे काम समाजातील जागरूक लोकांना करावे लागणार आहे. लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची घटना. त्यामुळे लग्न हे संस्मरणीय झालेच पाहिजे. मात्र, खर्चिक उधळपट्टीला फाटा देत साधे, सोज्वळ, मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हे कार्य पार पाडले तर ते अधिक योग्य ठरेल. कोरोना काळात तर “सध्याचा कोरोना प्रादुर्भाव पाहता..” या ओळीखाली हे सहज शक्य आहे. कोरोनाने आपल्यावर आणलेली वेळ हा एक संकेत आहे, लग्नकार्यानंतर प्रापंचिक व आर्थिक स्थैर्य मिळवण्याचा!

Continue reading

आनंदात वचन तर रागात निर्णय नेहमीच घातक!

आनंदात वचन तर रागात निर्णय घेऊ नये, असे म्हणतात. ते नेहमी घातक ठरते. यासाठीच लागते मनावर नियंत्रण. १० ऑक्‍टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्‍य दिन म्‍हणून साजरा केला जातो. आरोग्‍य हा आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या दृष्‍टीने अत्‍यंत जिव्‍हाळयाचा व संवेदनशील विषय...

सहकारी बॅंकामधील ठेवी किती सुरक्षित?

शासकीय बँका, नागरी सहकारी बँका व मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह बँका आता पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली आणण्‍याचा निर्णय नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून सहकारी बँकांमधून मोठे घोटाळे उघड झाले आहेत. त्‍यामध्‍ये लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी अडकलेल्‍या असून त्‍याचा...

करूया संकल्प लोकसंख्या नियंत्रणाचा!

आज ११ जुलै, जागतिक लोकसंख्‍या दिन. सन 1950 साली जगाची लोकसंख्या 250 कोटींच्या घरात होती. सन 1987 साली ही लोकसंख्या दुप्पट म्हणजे 500 कोटी झाल्याने वाढत चाललेल्या जागतिक लोकसंख्येच्या आकडेवारीला प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने 11 जुलै 1987पासून जागतिक लोकसंख्या दिन...
Skip to content