मुंबई महानगरपालिकेसह महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. या महापालिकांमध्ये सभागृह अस्तित्त्वात येण्यापासून महापौर निवडीपर्यंतच्या अनेक प्रक्रिया सध्या सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून 22 जानेवारीला कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गातील महापौर असावा यासाठी आरक्षणाची घोषित करण्यात आले. त्यानुसार आता महापौर निवडीची प्रक्रियाही सुरू होईल. दरम्यानच्या काळात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यातला कलगीतुरा रंगला आहे. हे दोन्ही पक्ष तेथे महायुती म्हणून लढले आणि आता महापौर कोणाचा बसावा यासाठी या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. शिवसेनेचे 53 तर भाजपाचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे युतीधर्म, नीतीमत्ता, या बोथट झालेल्या शब्दांना तिलांजली देत सेना आणि भाजपा आपापला महापौर बसवण्याच्या नादात तोडफोडीच्या कामाला लागले आहेत. याचाच परिणाम असा झाला की तेथे निवडून आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेच्या पाचही नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. मी जी शिवसेना म्हणतोय ती केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेना. ठाकरे बंधुंची युती झाल्यामुळे या खेळीत बाळासाहेबांच्या राजकारणाचाही वापर करण्यात आला.
महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी युती केली. या युतीतर्फे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली अशा काही महापालिकांमधून निवडणूक लढवण्यात आली. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे पाच नगरसेवक तर शिवसेना (उबाठा)चे 11 नगरसेवक निवडून आले. यातल्या मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला साथ देण्याची घोषणा केली. ही घोषणा करण्याआधी मनसेचे नेते संदीप देशपांडे तसेच कल्याण-डोंबिवलीचे माजी आमदार राजू पाटील यांची शिवसेनेचे नेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर एका हॉटेलमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या चर्चेनंतर राजू पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी या निर्णयाकडे काणाडोळा केला तर मनसेचे दुसरे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी हा निर्णय स्थानिक पातळीवर झाल्याचे सांगून हात वर केले. पक्षाने स्थानिक स्तरावर निर्णय घेण्याची मोकळीक दिली होती. त्यानुसार हा निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या या निर्णयावर शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मात्र थयथयाट केला. तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटही घेतली. या भेटीनंतरही त्यांनी मनसेच्या या निर्णयाशी आपला पक्ष सहमत नसल्याचे सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. या मंचावर येण्यापूर्वी समाजमाध्यमावर राज ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने घेतलेल्या निर्णयाचं जाहीर समर्थन केलं. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत गरज भासली त्यावेळी लवचिक धोरण स्वीकारले होते. अशीच लवचिकता आपण दाखवली असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मेळाव्यात व्यासपीठावर बोलताना राज ठाकरे यांनी सध्या राजकारणात जे काही चालले आहे त्याबद्दल उद्विग्नता व्यक्त केली. हे राजकारण पाहून आपल्याला शिसारी येत असल्याचे त्यांनी सांगितले. इतकी जर शिसारी येत असती तर या नगरसेवकांना त्यांनी पक्षातून काढून टाकायला हवे होते. अंबरनाथमध्ये काँग्रेसच्या 11

नगरसेवकांनी भाजपाला साथ देताच काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेतृत्त्वाने क्षणाचाही विलंब न लावता या सर्व नगरसेवकांना पक्षातून काढून टाकले. पोहणाऱ्या माशांना अलगद उचलणाऱ्या करकोच्याप्रमाणे मतदार काय म्हणतील याचा विचार न करता भाजपाने या नगरसेवकांच्या खांद्यावर कमळाचे उपरणे घातले, तो भाग वेगळा.. राज ठाकरेंना इतकीच शिसारी येत असेल तर पक्ष आणि राजकारण सोडून सक्रीय राजकारणातून त्यांनी निवृत्ती जाहीर केली असती. भाजपाचेच एकेकाळचे नागपूरचे महापौर आणि आताचे विधान परिषदेतले आमदार संदीप जोशी यांनी सध्याच्या राजकारणाला कंटाळून सक्रीय राजकारणातून नुकतीच निवृत्ती जाहीर केली. राज ठकरे त्या मार्गानेही जाऊ शकले असते. पण राजकारणामध्ये आपली भूमिका वारंवार बदलायची, सोयीचे राजकारण करायचे आणि नंतर सध्याचा राजकारणाकडे पाहून शिसारी येत असल्याचे म्हणायचे, हा दुटप्पीपणा झाला, जो राज ठाकरे करताहेत.
बाळासाहेबांनी त्यांच्या सक्रीय राजकारणात लवचिकता दाखवली पण दुटप्पीपणा केला नव्हता. त्यांच्या काळात निष्ठेला महत्त्व होते. याच निष्ठेपायी ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून वेगळी भूमिका घेतल्याबद्दल तेव्हाचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्त्या झाली होती. बाळासाहेबांच्याच हयातीत निष्ठेला सुरुंग लागत गेला. पक्षांतर्गत गटबाजी आणि बाळासाहेबांभोवती असलेले काही नेत्यांचे कडबोळे यामुळे पक्षात फूट पडत गेली. शरद पवार यांनी याच गोष्टीचा पुरेपूर वापर करत छगन भुजबळ यांना शिवसेनेतून फोडले. यासाठी विधिमंडळाचे नागपूर अधिवेशन निवडण्यात आले, जेणेकरून शिवसैनिकांमधून उद्रेक झालाच तर त्याची झळ भुजबळ यांना बसू नये. पण, त्यावेळी भुजबळ यांना फारसा विरोध झाला नाही. लखोबा लोखंडे तसेच टी बाळू असे परस्परांना संबोधण्यापलीकडे बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यातली कटूता पोहोचली नाही. पुढे गणेश नाईक फुटले. नारायण राणे काही आमदारांसह बाहेर पडले. राज ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि मनसेची स्थापना केली. यानंतर शिवसेनेत मोठे बंड झाले ते एकनाथ शिंदे यांच्या रूपाने 2022 साली. त्यांनी तर सत्तेतून बाहेर पडत शिवसेना पक्ष तसेच त्याच्या चिन्हावर दावा केला. सध्या या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. यावेळी तर मूळ शिवसेनेत अजिबातच उद्रेक झाला नाही. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदेंना मिंधे बोलण्यापलीकडे ही कटूता पोहोचली नाही. पक्षात वेळोवेळी पडलेल्या फुटीच्या वेळी जी लवचिकता बाळासाहेबांनी दाखवली तशाच प्रकारची लवचिकता उद्धवजींनीही दाखवली.
बाळासाहेबांचा राजकारणातल्या लवचिकतेचा गुण राज ठाकरेंनी आता उचलला. उद्धव ठाकरेंनी त्याचा वापर 2019मध्येच केला होता. महायुतीत भाजपाबरोबर निवडणूक लढवून सत्तेत राहण्याऐवजी एकाचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांड्यांवर बसून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. उद्धवजींची ही भूमिका राज ठाकरे यांना त्यावेळी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेली लवचिकता वाटली नसावी, म्हणून जोपर्यंत उद्धव ठाकरेंशी जवळीक होत नाही तोपर्यंत त्यांनी यावरून उद्धवजींवर मनसोक्त आणि जहरी टीका केली. आता कल्याण-डोंबिवली प्रकरणानंतर त्यांना ही भूमिका बाळासाहेबांच्या लवचिक राजकारणाप्रमाणे भासली. आपली भूमिका जरी लवचिक झालेली असली तरी ही भूमिका स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेली नाही, असे राज ठाकरे यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांचे हे वाक्यही बाळासाहेबांच्या मूळ भूमिकेला तडा देणारे आहे. बाळासाहेबांनी राजकारण करताना सत्तेत कोणतेही पद घेतले नाही. 1995 साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे राज्य आले त्यावेळी बाळासाहेब सहज मुख्यमंत्री होऊ शकले असते. परंतु त्यांनी तसे न करता मनोहर जोशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले. त्यानंतर काही काळासाठी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. परंतु बाळासाहेबांच्या राजकारणाचा हवाला देणारे राज ठाकरे यांनी आपल्या मुलाला पक्षाचे नेते बनवले. त्यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले. मुलगा आमदार झाला नाही तो भाग वेगळा. उद्धव ठाकरे तर स्वतः मुख्यमंत्री झाले. आपल्याच मंत्रिमंडळात मुलाला थेट कॅबिनेट मंत्रीपद दिले. पक्षसंघटनेत त्यांना नेतेपदी बसवले ते वेगळेच. आता हे दोघे ठाकरे बंधू बोलतील- आम्ही शिवसैनिक नाही का? बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिकांना वेगवेगळ्या पदांवर बसवले. रिक्षाचालक, वॉचमन, पान टपरीवाला मंत्री झाला. शिवसैनिकांना वेगवेगळ्या पदांवर बसवण्याचा बाळासाहेबांचा राजकारणातला गुणच आम्ही उचलला तर बोल का लावता? तो वैयक्तिक स्वार्थ कसा?
(लेखक किरण हेगडे महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार तसेच किरण हेगडे लाईव्हचे संपादक आहेत.)

