राज्य सरकारमध्ये नव्याने दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार अलीकडच्या काळात वारंवार ‘आजारी’ पडत असल्याने त्यांच्या ‘आजारपणावर’ जालीम इलाज व्हावा याकरीता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने राजधानी नवी दिल्ली येथे रवाना झाल्याचे वृत्त आहे.
राज्य मंत्रिमंडळात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारात अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या इतर ज्येष्ठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपदे बहाल करण्यात आली. मात्र सत्तेत दाखल झाल्यापासून शरद पवार यांच्या गटाने अजितदादांना कोंडीत पकडण्यासाठी विविध डावपेच अंगीकारले. यामध्ये अजितदादांबरोबर गेलेले दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा दिग्गज मंत्र्यांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेणे, पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे तसेच युवा नेते रोहित पवार आणि दस्तूरखुद्द शरद पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात करणे, आदींचा समावेश आहे.
एकीकडे हे सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाकडेदेखील राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांनी पक्षावर दावा केला आहे. त्यावर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे. अशा स्थितीत आपल्याला तसेच आपल्याबरोबर असलेल्या गटाला सांगितल्याप्रमाणे सत्तेत वाटा द्यावा, असा आग्रह अजित पवार यांच्याकडून केला जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार आणि त्यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, विविध पालकमंत्रीपदे तसेच महामंडळांची अध्यक्षपदे अशा सर्व मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रही आहेत.
यासाठी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री पवार तसेच ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेत हवे तसे स्थान मिळाल्याचे दिसून आले नाही. इतकेच नव्हे तर वित्त खाते सांभाळणाऱ्या अजितदादांकडून घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक निर्णयाची फाईल उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सहीला पाठवण्यात येईल, असे आदेश निर्गमित झाले. त्यामुळे सत्तेत असलेल्या अजितदादांची आणखीनच कोंडी झाली, असे बोलले जाते.
याचा परिणाम असा झाला की, काही महत्त्वाच्या ठिकाणी किंवा बैठकांना उपमुख्यमंत्री पवार हजर राहत नाहीत. त्यांच्या प्रकृती आस् वास्थ्याचे कारण पुढे केले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले असता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर या तिघांमध्ये एक बैठकही झाली. मात्र या सर्व दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा कुठेच दिसून आले नाहीत. आजही दिल्लीमध्ये जीएसटीविषयक निर्णय घेणाऱ्या समितीची (जीएसटी कौन्सिल) बैठक होती. वित्तमंत्री या नात्याने अजित पवार यात सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र पुन्हा आजारपणाचे कारण पुढे करत त्यांनी हा दौरा टाळला. त्यानंतर मुंबईतच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही दादांनी दांडी मारली. यामुळे दादांच्या नाराजीबद्दलच्या चर्चेला ऊत आला. त्यातच अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही ट्रिपल इंजिन सरकारमधले एक इंजिन बिघडले असल्याचा दावा करत अजितदादांवर निशाणा साधला हे. दरम्यान, मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात सुरू असलेली बैठक आटोपती घेत उपमुख्यमंत्री फडणवीस तातडीने राजधानी दिल्लीला रवाना झाल्याचे कळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही त्यांच्यासोबत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तेथे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे बोलले जाते. मुंबईतही अजित पवार यांनी देवगिरी, या आपल्या शासकीय निवासस्थानी आपल्या सहकाऱ्यांची बैठक बोलावल्याचे समजते.