मुंबईतल्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या मनोहर फाळके कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या 25 विद्यार्थ्यांनी भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, राणीबाग येथे भेट दिली. यावेळी 160 वर्षांचा समृद्ध वारसा लाभलेल्या या उद्यानातील वास्तूशास्त्रविषयक रचना व कार्यपद्धती, उद्यानविषयक नवनवीन संकल्पना, वृक्षसंपदा व उद्यानाविषयी इतर माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली, अशी माहिती उद्यान विभागप्रमुख जितेंद्र परदेशी यांनी दिली.
मनपा उद्यान विभागाच्या उपक्रमांनी प्रेरित होऊन अनेक विद्यार्थी, कॉलेजेस उद्यान विभागात इंटर्नशिपसाठी उत्सुक असतात. बृहन्मुंबई महापालिका उद्यान विभागामार्फत नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात. यात प्रामुख्याने पर्यावरणपूरक अशा नवनवीन कल्पना जसे की मियावाकी पद्धतीने कमी जागेत झाडांची लागवड करणे, गच्चीवरील उद्यान निर्मिती, भिंतीवरील बागा (vertical garden) खुल्या जागेतील व्यायाम शाळा, वृक्षसंजीवनी अभियान, वापरलेल्या प्लास्टिकपासून उद्यानातील बाकडे असे एक ना अनेक उपक्रम सीएसआरच्या माध्यमातून उद्यान विभागामार्फत सुरू असतात.
उद्यान विभागाच्या या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे उद्यान विभागाची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर याअगोदरच नोंद झालेली आहे. मुंबई शहरास अत्यंत प्रतिष्ठेचा असा जागतिक वृक्षनगरी 2022 व 2023चा किताब प्राप्त झाला आहे.