ही दोन छायाचित्रे आपल्याच राज्यातील शेजारीशेजारी असलेल्या महानगरांतल्या रस्त्यांची आहेत. एक आहे अंतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांसाठी महत्त्वाचा असलेला मुंबईतील पी डिमेलो मार्ग आणि दुसरे छायाचित्र आहे राज्यातील अति महत्त्वाची व्यक्ती असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील!
यातील समान धागा म्हणजे दोन्हीकडे रसत्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यातील पडद्याआडचे कलाकार दोन्हीकडील नोकरशहा आहेत. पी डिमेलो मार्गांवरील रसत्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून खोदकाम केलेल्या रस्त्यावर जाडसर लोखंडी पत्रा अंथरुन वाहतुकीत खंड पडू नये म्हणून घेतलेली काळजी. तर दुसरीकडे ठाणे शहरातील बापूडवाणा कोलशेत रोड! त्यात उखडून ठेवलेल्या रस्त्यावरील शिळा आपला उद्धार करायला श्री राम प्रभू कधी बरे येतील या विवंचनेत उन खात बसलेल्या आहेत.
तसे पाहिले तर हा रस्ता सुमारे अडीच वर्षं रुंदीकरणाचे स्वप्न पाहात उजाड झाला आहे. श्री राम प्रभू वनवासात गेल्यावर शिळेचा उद्धार झाल्याची कथा सांगतात. आता ठाण्यात कुणाला वनवासात पाठवल्यावर या रस्त्याचे काम मार्गी लागेल याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. आपल्यासाठीही कोणी लोखंडी पत्रा अंथरून चालता येईल असा रस्ता द्यावा, अशी विनवणी ढोकाली नाका परिसरात राहणारे अबालवृद्ध नागरिक मुख्यमंत्री महोदयांना करत आहेत. अति महत्वाच्या व्यक्तींना देता त्या सर्व सुविधा आम्हाला नकोतच. परंतु चालण्याच्या अधिकारासाठी रस्ता द्या, इतुकीच मागणी मायबापा पूरी करावी अशी विनंती आज हनुमानाकडेच करण्यात आली आहे.
छायाचित्र मांडणी- श्रेया साळसकर