डोकेदुखी व उलट्यांमुळे त्रस्त झालेली ५९ वर्षीय महिला मुंबईतल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात दाखल झाली. वैद्यकीय तपासणीत या महिलेच्या मेंदूतील रक्तधमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने अत्याधुनिक पद्धतीने दुर्मिळ शस्त्रक्रिया करत या महिलेस जीवदान दिले आहे. मुंबई महानगरात मेंदूविकार तज्ज्ञांनी अशा प्रकारची दुर्मिळ शस्त्रक्रिया पहिल्यांदाच केली असून देशातील ही ११ वी शस्त्रक्रिया आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. रू. न. कूपर रुग्णालयात अलीकडेच मज्जासंस्था विकार उपचार विभाग सुरू करण्यात आला आहे. याच विभागातील वैद्यकीय मंडळींनी दुर्मिळ प्रकारची ही मेंदू विकारावरील शस्त्रक्रिया करून महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे
जुहू / विलेपार्ले (पश्चिम) येथे पालिकेच्या डॉ. रू. न. कूपर रूग्णालय आहे. डोकेदुखी व उलट्यांमुळे त्रस्त झालेली एक ५९ वर्षीय महिला या रूग्णालयात दाखल झाली. आजाराचे निदान व्हावे म्हणून मेंदूच्या तपशीलवार प्रतिमेसाठी संगणित टोमोग्राफी अर्थात सीटी स्कॅन करण्यात आले. त्यात रुग्ण महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. दाट मऊ ऊतकांच्या वातावरणात रक्तवाहिन्या स्पष्टपणे दृश्यमान करण्यासाठी डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी (DSA) या फ्लूरोस्कोपी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यात सदर महिलेच्या मेंदूतील रक्त धमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचे निष्पन्न झाले. अन्युरिझम हा एक धमनीचा विकार आहे, ज्यामध्ये धमनीचे आवरण किंवा भिंत कमकुवत होते आणि धमनी फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो.
संपूर्ण निदानानंतर या रुग्ण महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मेंदू विकार (न्युरोलॉजी) तज्ज्ञांनी घेतला. ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ या उपकरणाच्या सहाय्याने आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर रूग्ण महिलेच्या रक्तामध्ये गुठळी होऊ नये म्हणून अस्पिरीन किंवा तत्सम औषधे देण्याची गरज लागत नाही. इतर पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यास रूग्णांना अस्पिरिन किंवा तत्सम औषधे द्यावी लागतात. त्यामुळे पुन्हा रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. दुर्मिळ आणि अत्याधुनिक पद्धतीने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे या महिलेला जीवदान मिळाले आहे.
डॉ. रु. न. कूपर रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी स्वतः तत्काळ प्रयत्न करून या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा आणि औषधे उपलब्ध करून दिली. डॉ. मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चेतासंस्थेच्या रोगांवर उपचार करणारे तज्ज्ञ (न्यूरोलॉजिस्ट) डॉ. प्रद्युम्न ओक, डॉ. मनीष साळुंखे, डॉ. अबू ताहिर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. भूलतज्ञ विभागप्रमुख डॉ. अनिता शेट्टी, औषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. नीलम रेडकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. दीप रावळ यांचे सहकार्य लाभले.
या शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते म्हणाले की, ‘ट्रेंझा एम्बोलिझेशन’ या उपकरणाच्या सहाय्याने भारतात झालेली ही ११वी शस्त्रक्रिया आहे. मुंबई महानगरात मेंदू विकार तज्ज्ञांनी केलेली अशा प्रकारची ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी बृहन्मुंबई महापालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालयात इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिस्टद्वारे अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. कूपर रुग्णालयातील मज्जा संस्था आणि मेंदू विकार तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ही दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी करत पालिकेच्या नावलौकिकात भर टाकली आहे. पालिकेच्या रूग्णालयात आधुनिक व गुंतागंतीच्या शस्त्रक्रिया अत्यंत माफक दरात होतात. सामान्य मुंबईकरांना त्याचा नेहमीच फायदा होतो, असेही डॉ. मोहिते यांनी नमूद केले.