Homeब्लॅक अँड व्हाईटभेट देण्यासाठी उत्तम...

भेट देण्यासाठी उत्तम वाचनीय पुस्तकः हसत जगावं

ताणतणावांचा ‘अभ्यास’ पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं ‘इन्स्टंट’ उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला; पण या ताणतणावांचं व्यवस्थापन मात्र अजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही. ते जमून गेलंय, भारतीय संस्कृतीलाच. ताणस्थितीत अर्जुनाला सांगितलेली ‘गीता’ आणि पर्यायानं ‘ज्ञानेश्वरी’ हे या समस्येवरील आद्यग्रंथ होत. काळाच्या ओघात स्वयंभू तेजस्वितेनं तळपत राहिलेल्या या ग्रंथातील तत्त्वज्ञान नित्यनूतन प्रकाश आणि आधार देतच आहे… आणि म्हणूनच भारतीय तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार ‘हसत जगावं’ सांगताना मोठ्या तळमळीनं, तरीही सहजपणे प्रकटतो. आधुनिक वैद्यकशास्त्र, मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान यांची यशस्वी सांगड घालणारं हे आगळंवेगळं पुस्तक.

सुधारित आवृत्ती असलेल्या या पुस्तकात तीन भाग आहेत. या तीन भागांमध्ये २६ लेख आहेत. शेवटी जी सात परिशिष्टे दिली आहेत, ती फार महत्त्वाची आहेत. या पुस्तकाची ही १४वी आवृत्ती आहे. ताणतणाव, टेन्शन याबद्दल हल्ली नेहमीच बोललं जातं. ताण सर्वंकष आहे. भावनिक, बौद्धिक, सामाजिक, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, विधायक, विघातक, आंतरिक, परिस्थितिजन्य, व्यक्तिजन्य, शारीरिक… कितीतरी प्रकारचे ताणतणाव. प्रत्येकजण ताणतणावांशी सामना करतोय. ही लढाई प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर आपापल्या परीनं लढावीच लागते.

फार पूर्वापार चाललाय हा लढा. हे सगळं काही आपल्याला नवीन नाही, पण एकविसावं शतक हे ताणतणावांचं औदासीन्याचं म्हणून ओळखलं जाईल असं मानसशास्त्रज्ञ म्हणतात, त्याअर्थी या लढाईनं उग्र स्वरूप धारण केलंय एवढं मात्र नक्की. ‘टेन्शन येतं म्हणजे नेमकं काय होतं?’ हे जाणून घेतल्याशिवाय त्यावर उपाय मिळणं-होणं अशक्य! आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली ती अशी, की पाश्चिमात्यांनी ताणतणावांचा वैज्ञानिक, वैद्यकीयदृष्ट्या अभ्यास उत्तम केला. यामुळे याबाबतचं वैज्ञानिक सत्य समजलं आणि काही इन्स्टंट उपायही त्यांनी शोधले. परंतु ताणतणावांशी यशस्वी सामना करताना माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य असावा लागतो. प्रत्येकाचं आपलं असं एक जीवन-तत्त्वज्ञान असतं आणि त्यानुसार तो जगत असतो. दृष्टिकोन जितका विवेकनिष्ठ तेवढी ताणतणावांवर मात अधिक. आणि हे मूलभूत उपाय भारतीय तत्त्वज्ञानातच सापडतात.

‘गीता’ अर्जुनाला तणावस्थितीत सांगितली गेली, म्हणूनच ‘गीता’ आणि पर्यायानं ‘ज्ञानेश्वरी’ हे तणावमुक्तीसाठी आद्यग्रंथ होत. त्या विशिष्ट काळात मी स्वतःच प्रचंड तणावाखाली होते. वरवरच्या उपायांचा उपयोग होईना. फक्त थोडा वेळ भूल दिल्यासारखं वाटायचं. काय करावं सुचेना आणि मग लहान मुलानं आईपाशी धावत जावं तशी मी ‘ज्ञानेश्वरी’कडे धावले. माझ्या मनाचा शोध घेऊ लागले. एक डॉक्टर म्हणून मला माहीत असलेलं ताणतणावांमागचं शास्त्र आणि विवेकनिष्ठ दृष्टिकोन बाळगून जीवन जगण्याची कला यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करू लागले आणि त्यावेळी जे सांगून स्वत:ची समजूत घातली तेच मी या पुस्तकात लिहिलं, असं मनोगत लेखिकेने व्यक्त केले आहे. त्या म्हणतात- ‘हसत जगावं’ या पुस्तकातून तणावमुक्तीचे मूलभूत तंत्रमंत्र समजतील. विचारांना दिशा मिळेल. मग प्रत्येकानं यातील आपल्या समस्येला उपयुक्त अनुकूल असा विचार/उपाय याची जोडणी आपली आपणच करावी. प्रत्येक क्षणाला आनंदानं रसरसून आलिंगन द्यावं. हसत जगावं… हसत जगावं!

हसत जगावं

लेखिका: डॉ. रमा मराठे

प्रकाशक: मधुश्री पब्लिकेशन

मूल्य- २५० ₹. / पृष्ठे- २३४

सवलतमूल्य- २२५ ₹.

कुरिअर खर्च- ५० ₹.

हसत

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148, 9404000347)

Continue reading

वाचा मार्क्स आणि विवेकानंद, एकाचवेळी!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी या दोघांच्या स्थापनेचे हे शताब्दी वर्ष. डाव्या-उजव्या विचारधारांच्या शताब्दीच्या वातावरणात साधकबाधक, समतोल चर्चेचा आणि कालसुसंगत निष्कर्षांचा आदर्श वस्तुपाठ ठरेल, असे हे पुस्तक.. पी. परमेश्वरन यांनी लिहिलेलं 'मार्क्स आणि विवेकानंद' हे पुस्तक. या...

ग्रामीण भागातल्या भयावह परिस्थिती मांडणारी ‘गोष्ट नर्मदालयाची’!

देशाने स्वातंत्र्य मिळवलं, त्याला आता ७८ वर्षं पूर्ण झाली. पण आजही ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट आहे. शिक्षणाचं तर विचारुच नका. हे पुस्तक वाचताना वाचकांच्या डोळ्यांतून अश्रू आपोआपच कधी झिरपतील, हे लक्षातच येणार नाही. हे पुस्तक शहरातील प्रत्येक कुटूंब सदस्यांसमोर...

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेट देण्यासारखे पुस्तक ‘छत्रपती शिवाजीमहाराज’!

छत्रपती शिवाजीमहाराज. प्रस्तुत चरित्र विद्यार्थ्यांकरिता लिहिले असून ते संशोधकीय पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवले आहे. एकूण १२ प्रकरणांतून महाराजांचे हे वाचनीय चरित्र मांडण्यात आले आहे. शिवाजीमहाराजांनी मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांनी अत्युत्कृष्ट प्रशासक आणि धडाडीचे...
Skip to content