भारतीय लष्करातील राजपुताना रायफल्सशी संलग्न बटालियनमधील 32 कर्मचार्यांचा समावेश असलेली तुकडी, 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत रशियामध्ये आयोजित दहशतवादविरोधी प्रत्यक्ष प्रशिक्षण सराव 2023 संबंधी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक (ADMM) आणि तज्ञ कृतिगट (EWG) साठी रवाना झाली. म्यानमारसह तज्ञ कृतिगटाचे सह-अध्यक्ष म्हणून रशियाने हा बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सराव आयोजित केला आहे. 2 ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत म्यानमारच्या नेप्यिडॉ येथे झालेल्या दहशतवादविरोधी एडीएमएम प्लस ईडब्ल्यूजीच्या टेबल टॉप सरावानंतर हा प्रशिक्षण सराव आयोजित करण्यात आला आहे.

2017 सालापासून, वार्षिक एडीएमएम प्लस बैठक दक्षिण पूर्व आशियाई देश आणि अन्य देशांबरोबर संवाद आणि सहकार्याच्या संधी प्रदान करते. 12 ऑक्टोबर 2010 रोजी व्हिएतनाममधील हनोई येथे पहिल्या एडीएमएम प्लसचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षी आसियान सदस्य देशांबरोबर प्लस गटातले देश देखील या सरावात सहभागी होणार आहेत.
या सरावात अनेक दहशतवाद विरोधी कवायतींचा समावेश असेल. यात तटबंदी असलेल्या भागातील दहशतवादी गटांना उध्वस्त करण्याचा देखील समावेश असेल. दहशतवादविरोधी क्षेत्रात प्रादेशिक सहकार्य मजबूत करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे.

दहशतवादविरोधी एडीएमएम प्लस ईडब्ल्यूजी भारतीय सैन्याला दहशतवादविरोधी कारवायांमध्ये त्यांचे कौशल्य आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल, त्याचबरोबर इतर 12 सहभागी देशांबरोबर सहकार्य वृद्धिंगत करेल. या सरावातून भारतीय सैन्याला समृद्ध व्यावसायिक अनुभव मिळेल अशी आशा आहे.