दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने आंतरराष्ट्रीय संगीत दिनाच्या निमित्ताने एक विशेष संगीत कार्यक्रम ‘त्रिधा’ सादर होणार आहे. येत्या रविवारी, १८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात हा कार्यक्रम होईल.
कार्यक्रमाची संकल्पना प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे यांची असून, त्यात गीत, वाद्य आणि नृत्य या तीन कलांचे एकत्रित सादरीकरण केले जाईल. कार्यक्रमासंदर्भात संस्कृत सुभाषित देण्यात आले आहे- “गीतं, वाद्यं, नृत्यं, त्रयं संगीतं उच्यते।” कार्यक्रमात पं. विजय घाटे (तबला), शीतल कोलवालकर (कथक), कृष्णा बोंगाणे (गायन), शिखर कुरेरी (ड्रम्स), यशवंत थिटे (संवादिनी) आणि सागर पाटोकर (पढंत) या कलाकारांचा सहभाग राहील. ‘त्रिधा’ या कार्यक्रमातून शास्त्रीय संगीत, कथक नृत्य आणि आधुनिक वाद्यांचे मिश्रण प्रेक्षकांना अनुभवता येईल. रसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

