होणार–होणार म्हणून गेले अनेक दिवस गाजत असलेली उद्धव ठाकरे ह्यांची शिवसेना आणि राज ठाकरे ह्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती जाहीर झाली. अर्थातच ही युती जाहीर झाल्यापासून त्याच्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया, राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी आणि प्रसारमाध्यमांची धावपळ. नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. त्याखालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी. मात्र ह्या निवडणुकीत काँग्रेसवगळता राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा, ह्या दोन्ही पक्षांचे अक्षरश: पानीपत झाले. मनसेने तर ही निवडणूक लढवलीच नव्हती. त्यामुळे आता उबाठा आणि मनसे फक्त मुंबई महापालिकेवर डोळा ठेवून एकत्र आले आहेत हे नक्की. त्यातल्यात्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि नाशिक इथेही युती होणार असल्याचे बोलले जाते. मात्र त्याचा तपशील पत्रकार परिषदेत जाहीर केला गेला नाही. आम्ही दोघे एकत्र आलो आहोत एव्हढेच सांगण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. जी केवळ 12 मिनिटांत आटोपण्यात आली. त्यातही पहिले पाच मिनिटे संजय राऊतच बोलले.
मुंबईतल्या मराठी जनतेला केवळ भावनिक साद घालण्यात आली. मराठी जनतेने केवळ उबाठा आणि मनसे ह्यांना निवडून द्यावे असे आवाहन केले जात आहे. गेली 25 वर्षे निवडणुका आल्या की, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे, अशी आवई उठवायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची, हीच शिवसेना (उबाठा)ची पद्धत आहे. अगदी बाळासाहेब ठाकरे असल्यापासून. मग केंद्रात सरकार कुणाचेही असो. ह्याच मुद्द्यावर निवडणुका लढवायच्या. मात्र इतक्या वर्षांत तसे काही घडले नाही. आता ह्या निवडणुकीत पुन्हा हाच मुद्दा उद्धव ठाकरेंनी मांडला. कारण दुसरा कुठला मुद्दाच नाही. ना मुंबईच्या विकासाचा मुद्दा, ना नवीन काही योजनांचा. कुठलाच कार्यक्रम नाही. स्वत: मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे ह्यांनी सर्व विकासप्रकल्पांना स्थगिती दिली. आता कुठल्या तोंडाने विकासाचा मुद्दा मांडणार. आदित्य ठाकरे ह्यांनी एक सादरीकरण करून ‘हे करून दाखवले..’ असे म्हणत मुंबईतील कोस्टल रोडचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. जरी कोस्टल रोडचे काम उद्धव ठाकरेंच्या काळात सुरू झाले असले तरीही ज्या वेगाने ते काम फडणवीस आणि शिंदे ह्यांच्या सरकारने पूर्ण केले आणि मुंबईकरांच्या सेवेत कोस्टल रोड आणि अटल सेतू दाखल केले, त्यामुळे दक्षिण मुंबईची वाहतूककोंडी कमी होण्यास मदत झाली. त्याशिवाय मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई येथील मेट्रो रेल्वेचे जाळे उभारण्यात आले आणि त्याची अनेक कामे प्रगतिपथावर आहेत त्यासाठी मुंबईकर नक्कीच त्यांना धन्यवाद देतील. मात्र महानगरांतील समस्या आहेत, त्याबाबतीत कुणीच काही बोलत नाही. दर पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते, पाण्याची समस्या, सांडपाणी, फेरीवाले, पदपथावर चालता येत नाही, खड्ड्यांचे रस्ते, ह्यावर सगळेच गप्प आहेत.

दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्याचा नक्कीच आनंद सामान्य मुंबईकर मराठी माणसाला झाला आहे. आणि ह्या दोघांच्या एकत्र येण्याचे त्यानी फटाके वाजवून, गुलाल उधळून स्वागतही केले. मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी शिवसेना बाळासाहेबांच्या काळात नक्कीच होती. म्हणूनच हा मराठी माणूस साहेबांना दैवत मानत होता. अनेक तरुण मराठी मुले साहेबांच्या एका शब्दावर अगदी जीव टाकत होती. मात्र तो दरारा, तो धाक, ती भीती आताच्या शिवसेनेत राहिली आहे का असा प्रश्न पडतो. बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शेवटच्या जाहीर सभेत माझ्या उद्धवला सांभाळा असे आवाहन, नव्हे अशी साद शिवसैनिकांना घातली होती. त्या शब्दासाठी आज अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहेत. मात्र एकनाथ शिंदे ह्यांच्या बंडानंतर ही परिस्थिती बदलली. अनेकजण ठाकरेंना सोडून गेले. त्यामुळेच शेवटी स्वत:चे अस्तित्त्व, स्वत:चा पक्ष टिकवण्यासाठी जे 20 वर्षांपूर्वी वेगळे झाले होते, त्या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र यावे लागले. निदान मराठी मतांची तरी फाटाफूट नको ह्या विचाराने त्यांनी एकत्र येण्याचे ठरवले असावे. मात्र आकडेवारी पहिली तर आता मुंबईत मराठी मतांचा टक्का घसरला आहे. गिरणी कामगारांच्या संपानंतर हजारो मराठी कुटुंबे, गिरगाव, लालबाग,परळ येथील स्वत:ची घरे सोडून एकतर गावाला गेले किंवा ठाण्याच्या पुढे म्हणजे, कर्जत, बदलापूर पनवेल येथे स्थलांतरित झाले आहेत. मुंबईतले सगळे मराठी मतदार फक्त उबाठा आणि मनसेकडे जातील असे आहे का? भाजप, शिंदेंची शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, रामदास आठवले ह्यांचा रिपब्लिकन पक्ष आणि काँग्रेससुद्धा, ह्यांच्याकडेही मराठी मतदारांचा ओढा असेलचना. ह्या सगळ्या पक्षांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी, अगदी भाजपचेसुद्धा मराठीच आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंनी केवळ मराठी मतदारांवर विसंबून राहू नये.
दुसरा मुद्दा म्हणजे, अलीकडे मराठीच्या मुद्द्यावरून उबाठा आणि मनसे ह्यांनी अमराठी लोकाना केलेली मारहाण आणि दहशत फैलावण्याचा प्रयत्न. ह्यामुळे अमराठी मतदार, ज्यांची संख्या मुंबईत भरपूर आहे, ते मतदार इतर पक्षांना मते देतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाकरे बंधू ही निवडणूक मराठी विरुद्ध इतर अशी करण्याचा प्रयत्न करत आहेत तर भाजपला ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवायची आहे. दुसरीकडे भाजपा-शिवसेना महायुतीचेही जागावाटप अजून होत नाही. दुसरीकडे अजित पवार आपली वेगळी चूल मांडताना दिसत आहेत. मुंबईत माजी मंत्री नवाब मलिक ह्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवणार म्हणून भाजपा आणि शिवसेनेने त्यांना बरोबर घेण्यास नकार दिला. दुसरीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. तीच गोष्ट पिंपरी चिंचवड महापालिकेची. आता पक्षांतराला भलताच जोर आला आहे. मनसे नेते प्रकाश महाजन ह्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, तर उबाठाच्या तेजस्वीनी घोसळकर ह्यांनी भाजपची वाट धरली आहे. पुण्यात प्रशांत जगताप ह्यांनी अखेर कोंग्रेसला जवळ केले आहे. त्यामुळे ह्या निवडणुकीत नक्की कोण कुणविरुद्ध लढतेय आणि निकाल काय लागणार हे येणारा काळच ठरवेल.
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत.)

