एकांकिका, या नाट्यप्रकाराबद्दल मी काय सांगावे? या पुस्तकाच्या संपादक विशाखा कशाळकर ‘लेखकांसाठी खुला एकांकिका वाचनमंच’च्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने लिहितात-
नाटक ही सांघिक कला आहे. नाटक करायचे तर टीमची गरज लागते. उपजत लेखनकला एकलव्याप्रमाणे विकसित करणाऱ्या विद्यार्थीदशेतील लेखकांना त्यांच्याजवळील उपलब्ध संस्थेत, कॉलेजात बऱ्याचदा प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. एकांकिका करणारी टीम अशा एकांड्या लेखन शिलेदारांना हेरणारच नसेल तर हे स्वयंभू एकांकिका लेखक स्वतःला पारखणार तरी कसे? हे झाले महाविद्यालयीन लेखकांचे. जुन्याजाणत्या एकांकिका लेखकांना भेडसावणारी समस्याही वेगळी नाही. एकांकिका लिहायची तर कुणासाठी? सोबत टीम नाही… टीमशिवाय कुठेही सादर करू शकत नाही. मग अशा स्थितीत ही एकांडी लेखनकला तगणार कशी? लिहिण्याची प्रेरणा टिकून कशी राहणार? या साऱ्या विचाराने, मी विशाखा कशाळकर प्रतिष्ठानच्या पुढाकाराने कोणताही सुप्त व्यावसायिक हेतू न ठेवता निःस्पृह, पारदर्शी हेतू ठेवून ‘लेखकांसाठी खुला एकांकिका वाचन मंच’ची निर्मिती केली. फक्त नवोदितांनाच नाही तर, सर्व मराठी एकांकिका लेखकांना, प्रत्येक महिन्याला उपलब्ध असलेले आजमितीस हे ‘एकमेव व्यासपीठ’!!

एकांकिका स्पर्धांमधून आपल्याला अनेक गुणी अभिनेते, दिग्दर्शक, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार, संगीतकार, तंत्रज्ञ मिळाले. मात्र गेल्या काही वर्षांत एकांकिकांमध्ये नाट्य कमी आणि स्पर्धा जिंकण्यासाठी वापरलेली समीकरणंच जास्त दिसू लागली. सादरीकरणाला महत्त्व आले. मग संगीत, नृत्य, वेशभूषा, प्रकाशयोजना, नेपथ्य या पूरक असणाऱ्या गोष्टी अवास्तव मोठ्या झाल्या. दिग्दर्शकीय आकृतिबंध टाळ्या घेऊ लागले. कॅरेक्टर्स हरवली आणि कॅरिकेचर्स भाव खाऊ लागली. रंगमंचावर पात्र अंधूक झाली, गर्दी ठळक झाली. प्रत्येक प्रसंग गर्दीने भारला जाऊ लागला. गिमिक्सचा मारा करीत डोळे दिपविण्याचे कौशल्य पणाला लागले. अभिनयात आंगिक, आहार्य वरचढ होऊ लागले. वाचिक अभिनयावर मेहनत घेणे बंद झाले. साहजिकच या सर्वात लेखक पूर्णपणे गुदमरला. साहित्यिकमूल्य हरवले. क्राफ्ट, आखीव, रेखीव, घोटीव, बांधेसूद साहित्यिक नाट्यानुभव एकांकिका विश्वातून हद्दपार होणार असतील तर हे सारे फक्त कागद आणि पेनाच्या साहाय्याने ‘प्रसवणारा’ लेखक घडणार कसा? स्वतःमधील लेखकाला घडवण्याची प्रक्रिया एकांकिकांमधून साध्य होत नसेल तर एकांकिका स्पर्धांमधून फक्त लेखनिक तयार होतील, लेखक नाही. लिपिक, टंकलेखन करणारा म्हणजे लेखक नव्हे. पानंच्या पानं लिहून काढणे म्हणजे लेखन नव्हे. प्रत्येकजण चांगले लेखन करू शकत नाही. हे एक विशेष कौशल्य आहे, ज्यासाठी कठोर परिश्रम, सराव आणि अनुभव आवश्यक आहे. लेखन ही एक कला आहे आणि समर्पित भावनेने ही कला विकसित करावी लागते. आपली अभिरूची कायम अपडेटेड असायला हवी. आमच्यातील रंगधर्मीला मुळातून रंगअभ्यासक व्हावे लागेल.
महाराष्ट्रभरात वर्षभर १२ महिने सलग राबविलेला हा उपक्रम. यात १२ उपक्रमांत सर्वोत्कृष्ट ठरलेल्या १२ विजेत्या एकांकिकांच्या संहिता या पुस्तकात आहेत. सोबतच ‘एकांकिका’ या साहित्यिक प्रकाराचे समग्र रूप या पुस्तकाला यावे म्हणून एकांकिकाविषयीचे अत्यंत महत्त्वाचे डॉ. वि. भा. देशपांडे, प्रेमानंद गज्वी, प्र. ना. परांजपे, नारायण जाधव, राजीव जोशी, ज्ञानेश्वर मर्गज यांचे सहा लेख छापले आहेत.
एकांकिका
संपादक: विशाखा कशाळकर
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे: ३३७ / मूल्य: ४०० ₹.
पुस्तक खरेदीसाठी व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवावे. रक्कम जमा केल्यावर स्क्रीनशॉट पाठवावा. सोबत पूर्ण पत्ता पिनकोडसह व मोबाईल क्रमांकासह पाठवावा. पुस्तक तीन ते चार दिवसांत मिळेल.

पुस्तक खरेदीसाठी संपर्कः ग्रंथ संवाद वितरण- 8383888148