बांबू लागवडीसाठी खड्डे खोदणे व बांबू कापणे या कामांसाठी मानवविरहित यंत्राचा वापर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे महाराष्ट्राचे कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगितले.
कृषी मंत्र्यांच्या मुंबईत मंत्रालयातील दालनात पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सची बैठक झाली. डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ इनव्हा ॲग्रो मेक प्रा.लि.चे वेंकट राव, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे सरदार बलमल सिंह यावेळी उपस्थित होते.
राज्यातील पडीक जमिनीवर २१ लाख हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लागवडीसाठी खड्डे खोदण्यासाठी भारतातील पहिली इलेक्ट्रिक टूल बार यंत्रणा वापरण्यात येणार आहे. एक एकर क्षेत्रात एक व्यक्ती दोन ते तीन दिवसात फक्त १२ ते १३ खड्डे काढू शकतो. मात्र या इलेक्ट्रीक टूल बार, या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे ४५० बांबू लागडवडीसाठी खड्डे खोदता येतील. या यंत्रासोबत बांबू कापण्यासाठी मनुष्यबळदेखील आवश्यक आहे. हे लक्षात घेता यामध्ये डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्रामार्फत अधिक संशोधन करून बांबू कापण्यासाठीदेखील आधुनिक तंत्रज्ञान विकसित करावे, अशा सूचना पटेल यांनी केल्या.