दक्षिण अमेरिका म्हणजेच ‘पाताळ’ असा लेखकाचा दृढविश्वास आहे आणि आपल्या पुराणांप्रमाणे बळीराजा पाताळात गेला; म्हणजेच अगदी निश्चितपणे दक्षिण अमेरिकेत गेला. लेखक अनिल ज. पाटील याच्या पाताळयात्रा, या पुस्तकाचा हा गाभा आहे.
काय आहे या पुस्तकात?
ह्या कथेचा मुख्य भाग (थीम) बळीराजा पाताळात म्हणजे अमेरिकेत गेला; तो समुद्रमार्गे, आणि मय, शंबरादी प्रभृती रशिया, सैबेरिया-अलास्का असे भूमार्गाने पाताळात गेले, हे अगदी सत्य आहे. ह्याचे भरपूर पुरावे कथेच्या ओघात जेथल्या तिथेच लगेचच दिले आहेत.
‘स्वर्ग’ म्हणजे ‘त्रिविष्टप’ म्हणजेच आजचे तिबेट होय. नकाशात उत्तर वर दाखवतात; म्हणून कदाचित स्वर्ग वर बोट करून दाखवत असावेत. इथपर्यंत ठीक आहे; पण ‘त्रिविष्टपम’ म्हणजे तीन घड्या असलेला असा अर्थ आहे. आणि भूगर्भशास्त्रज्ञांना हे माहीत आहे की, तीन मोठ्या भूकंपांमुळे तिबेटचा भूगर्भ तीन वेळा अक्षरशः पिळला गेला आहे!
दक्षिण अमेरिकेतील पेरू येथील नगण्य कंपनीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी तीन विलक्षण बुद्धिमान भारतीय इंजिनियर्स निघतात आणि अचानक… अचानक मती गुंग करणारा अपघात होतो. तर्काला आव्हान देणारी कलाटणी मिळते. दक्षिण अमेरिकेतील प्राचीन संस्कृती एखाद्या गूढासारखी छळत राहते. भूत, भविष्य, वर्तमानकाळाची संकल्पना विसरली जावी अशा घटना घडत जातात. एका अनोख्या अनुभवाचे दालन उघडून, कृष्णविवरामध्ये गतिमान होऊन स्वतःचे अस्तित्त्व विसरायला लावणारी ही ‘पाताळयात्रा’.
हा पंधरा हजार वर्षांपेक्षा जास्त प्राचीन इतिहास शास्त्रीय पुरावे देऊन मांडला आहे. अतिशय परिश्रमाने सचित्र पुरावे जमवले आहेत हे परिशिष्टावरून लक्षात येते. म्हणून बळीराजाची कथा ही पुराणातील ‘वांगी’ न राहता वास्तुनिष्ठ इतिहास झाली आहे. परंतु ही ललित कृती असल्याने ‘भरतकाम’ भरपूर आहे. पण लेखकाने मूळ संकल्पनेला बाधक गोष्टी जबाबदारीने टाळल्या आहेत. विषयाच्या गांभीर्याबद्दल लेखक सतत सतर्क राहिले आहेत. शेवटी दिलेली संदर्भग्रंथ सूची अभ्यासकांसाठी खूपच उपयुक्त आहे. कादंबरी इतकी उत्कंठावर्धक झाली आहे की बसल्या बैठकीत वाचल्याशिवाय राहवत नाही.
पाताळयात्राः
लेखक: अनिल ज. पाटील
प्रकाशक: उन्मेष प्रकाशन, पुणे
मूल्य: ३५०/- रुपये
सवलत मूल्य: ३१५/- रुपये
टपालखर्च: ५०/- रुपये
संपर्क: ग्रंथ संवाद वितरण (8383888148)