खेळ स्थानिक असोत, प्रादेशिक असोत की राष्ट्रीय.. किंवा अगदी ऑलिम्पिक असोत. खेळाडू पुरुष असोत की महिला… त्यांच्या बाबतीत एकच महत्त्वाची बाब यावेळच्या ऑलिम्पिकमध्ये दिसत आहे ती अशी की, या सर्वांसाठी गोंदण (टॅटू) ही अतिशय महत्त्वाची बाब झाली आहे. जवळजवळ सर्वच खेळाडू आज गोंदणाने माखलेले आणि ते मिरवताना दिसत आहेत असे म्हटले तरी चालेल.
गोंदण या कलेचे एक अतिभव्य असे प्रदर्शनच जणू या नगरीत भरले आहे की काय असा भास व्हावा, इतक्या प्रकारचे हे गोंदण आहे. कुणी मुष्टीयोद्धा आपल्या बाहूवर जबरदस्त गोंदण मिरवतोय तर महिलांपैकी अनेक एकापेक्षा एक अशी पानाफुलांची आणि आपापल्या खेळातील महनीय खेळाडूंची चित्रेही मिरवीत आहेत.
गोंदण हा कलेचा एक प्रकार मानला गेला असून यात त्वचेमध्ये एक किंवा अधिक रंग सोडले जातात. त्यामधून एक कलाकृती निर्माण केली जाते. ही कला अतिशय प्राचीन असल्याचे मानले जाते आणि त्यात स्वत:ची अभिव्यक्ती दाखवली जाते, असे मानतात. इतिहासाचे संदर्भ पाहिले तर असे दिसते की गोंदण फ्रान्स, पोर्तुगाल आणि इतर काही देशांत अत्यंत लोकप्रिय होते आणि त्यांचा इतिहास किमान १२ हजार वर्षांचा आहे.
गोंदण आणि त्याच्या सोबतीने खेळाडू आपल्या शरीरावर कोणती कलाकुसर वागवीत आहेत याचा विचार केला तर अनेक खेळाडूंनी आणि स्पर्धकांनी आपली नखेही सुशोभित करून घेतली आहेत. ती इतकी की त्यांचेही एक प्रदर्शन होऊ शकेल. ज्यात शरीराची आणि त्यासोबतच मनाची लवचिकता पणाला लागते असा जिम्नास्टिक हा खेळ आहे. या ठिकाणीदेखील महिला आणि पुरुषांचे पोशाख अतिशय योग्य रीतीने बनवण्यासाठी किमान दोन वर्षे लागतात असे वाचले तेव्हा आश्चर्य वाटणारच होते. परंतु इतक्या प्रकारे आणि वेगवेगळ्या कोनातून शरीराला फिरवीत असताना साहजिकच आपला पोशाख आपल्याला मदत करणारा असावा आणि त्याने अडवणूक करू नये हेच तर त्यांना बघायचे असते.