महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये यंदा ९४वे अखिल भारतीय साहित्य संमेलन येत्या २५ ते २८ मार्चदरम्यान होणार असून याचदरम्यान नाशिकमध्येच १५वे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळीकडून आयोजित या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी शेतकरी आंदोलनाला ट्विटरवरून पाठिंबा देणाऱ्या वादग्रस्त आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांना निमंत्रित करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.
मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांची पत्रकार परिषद झाली. त्यात विद्रोहीच्या अध्यक्षा प्रा. प्रतीमा परदेशी यांनी १५व्या संमेलनाची घोषणा केली. २५ आणि २६ मार्चला नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएमएच महाविद्यालयाच्या आवारात संमेलन होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे समीक्षक डॉ. आनंद पाटील (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. पाटील आघाडीचे सांस्कृतिक तुलनाकार व इतिहासकार आहेत. निर्भीड मांडणी आणि आंतरविद्याशाखीय व्यासंगासाठी ते ओळखले जातात. कागूद आणि सावली, या त्यांच्या दोन लघु कांदबऱ्या गाजल्या आहेत. गोवा, नवी दिल्ली आणि उत्तर गुजरात विद्यापीठात ते प्राध्यापक होते. त्यांची २४पेक्षा अधिक ग्रंथसंपदा प्रकाशित झाल्याचे विद्रोहीचे राज्य संघटक कॉ. किशोर ढमाले यांनी सांगितले.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाला राज्य सरकार देत असलेले ५० लाख रूपयांचे अनुदान रद्द करावे, अशी मागणी विद्रोही संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे यांनी यावेळी केली. मूठभर धान्य आणि एक रुपया अशी वर्गणी घेऊन हे संमेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे सर्व नियम पाळून संमेलन घेणार असल्याचे विद्रोहीचे विश्वस्त गणेशभाई उन्हवणे म्हणाले. दिल्लीत चालू असलेले शेतकरी आंदोलन आणि केंद्रातल्या मोदी सरकारकडून होत असलेली अभिव्यक्तीची गळचेपी, या पार्श्वभूमीवर नाशिक येथे हे १५वे विद्रोही साहित्य संमेलन होत आहे, असे राजू देसले म्हणाले.