Sunday, September 8, 2024
Homeन्यूज अँड व्ह्यूजनोव्हेंबरमध्ये ईपीएफओमध्ये 14...

नोव्हेंबरमध्ये ईपीएफओमध्ये 14 लाख नव्या सदस्यांची भर!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) 20 जानेवारी 2024 रोजी जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार ईपीएफओमध्ये नोव्हेंबर, 2023 मध्ये एकूण 13.95 लाख सदस्यांची भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षात सदस्यांची एकत्रित निव्वळ वाढ मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत अधिक राहिली आहे.

आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2023 मध्ये सुमारे 7.36 लाख नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. या नव्या सदस्यांमध्ये, 18 ते 25 वर्षे वयोगटातील सदस्य हे या महिन्यादरम्यान जोडल्या गेलेल्या एकूण नवीन सदस्यांच्या 57.30% आहेत. यावरून, देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचारी वर्गात सामील होणारे बहुतांश सदस्य युवा असून ते बहुधा प्रथमच नोकरीच्या शोधात असावेत असे दिसून येते.

वेतनपट आकडेवारीनुसार अंदाजे 10.67 लाख सदस्य संघटनेतून बाहेर पडले आणि पुन्हा सामील झाले. खरे तर या सदस्यांनी त्यांच्या नोकऱ्या बदलल्या, ईपीएफओच्या कक्षेत असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू झाले आणि अंतिम सेटलमेंटसाठी अर्ज करण्याऐवजी त्यांनी जमा झालेली रक्कम हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला, पर्यायाने सामाजिक सुरक्षा संरक्षण कायम राखले.

लिंगनिहाय वेतनपट विश्लेषणानुसार या महिन्यात समाविष्ट झालेल्या एकूण 7.36 लाख नवीन सदस्यांपैकी सुमारे 1.94 लाख नवीन महिला सदस्य असून त्या प्रथमच ईपीएफओ मध्ये सामील झाल्या आहेत. तसेच, या महिन्यात समाविष्ट झालेल्या एकूण महिला सदस्यांची संख्या 2.80 लाख इतकी होती. निव्वळ सदस्यांच्या वाढीमध्ये निव्वळ महिला सदस्यांची टक्केवारी 20.05% असून सप्टेंबर 2023 नंतरची ही सर्वाधिक टक्केवारी आहे. यातून संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा वाढता सहभाग दिसून येतो.

वेतनपट आकडेवारीच्या राज्यनिहाय विश्लेषणानुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात आणि हरियाणा या 5 राज्यांमध्ये नव्याने समाविष्ट झालेली ईपीएफओ सदस्य संख्या सर्वाधिक आहे. एकूण सदस्यसंख्येत या राज्यांचा वाटा सुमारे 58.81% टक्के असून या  महिन्यात एकूण  8.20 लाख सदस्यांची भर पडली आहे. सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्र, महिनाभरात एकूण 21.60% सदस्य संख्येसह आघाडीवर आहे.

उद्योग-निहाय आकडेवारीची मासिक तुलना ही कृषी, कॉफी लागवड, साखर, रबर लागवड, टाइल्स इत्यादींमध्ये सहभागी आस्थापनांमध्ये काम करणार्‍या सदस्यांमध्ये लक्षणीय वाढ दर्शवते. एकूण निव्वळ सदस्यांपैकी सुमारे 41.94% नवे सदस्य तज्ञ सेवा क्षेत्रातील (मनुष्यबळ पुरवठादार, सामान्य कंत्राटदार, सुरक्षा सेवा, अन्य) आहेत.

वरील वेतनपट आकडेवारी तात्पुरती आहे कारण डेटा निर्मिती ही एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कर्मचाऱ्यांची माहिती अद्ययावतकरणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे यापूर्वीची आकडेवारी दर महिन्याला अद्ययावत केली जाते. एप्रिल 2018 पासून ईपीएफओ सप्टेंबर 2017 नंतरच्या कालावधीचा समावेश असलेला वेतनपट माहिती जारी करत आहे. मासिक वेतनपट माहितीमध्ये आधार प्रमाणित सार्वत्रिक खाते क्रमांक  (UAN) द्वारे प्रथमच ईपीएफओमध्ये सामील होणार्‍या सदस्यांची संख्या, ईपीएफओ मधून बाहेर पडलेले विद्यमान सदस्य आणि जे बाहेर पडले, मात्र पुन्हा सदस्य म्हणून सामील झाले, अशा सदस्यांची संख्या निव्वळ मासिक वेतनपटासाठी विचारात  घेतली जाते.

Continue reading

श्री गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदाही विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या उत्सवाकरीता मुंबई महापालिकेचे सुमारे १२ हजार कर्मचारी, ७१ नियंत्रण कक्ष तसेच अन्य विविध सोयीसुविधांसह सुसज्ज आहेत. यंदा गणेश मूर्ती विसर्जनासाठी ६९ नैसर्गिक स्थळांसह एकूण २०४ कृत्रिम...

१७५३ शेतकऱ्यांना दिवसा होणार वीजपुरवठा उपलब्ध

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून त्यापैकी ३ मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे नुकताच...

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची पारंपरिक पद्धत

श्री गणेशमूर्तीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. विसर्जनाला जाताना श्री गणेशमूर्तीबरोबर दही, पोहे, नारळ, मोदक वगैरे शिदोरी द्यावी. जलाशयाजवळ पुन्हा आरती करावी व मूर्ती शिदोरीसह पाण्यात सोडून द्यावी. उपासनाविधींमुळे गणपतीच्या पवित्रकांनी समृद्ध झालेल्या मूर्तीचे विसर्जन केल्यामुळे जलस्रोत पवित्र बनतो. तसेच...
error: Content is protected !!
Skip to content