Details
“केएचएल न्यूज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
गेल्या वर्षी, राष्ट्रीय व्याघ्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या दर चार वर्षांनी होणाऱ्या राष्ट्रीय व्याघ्र गणना 2018च्या अहवालानुसार कॅमेराद्वारे केलेल्या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव सर्वेक्षणात भारतातील व्याघ्र गणनेने नवीन गिनीज रेकॉर्ड स्थापित केला आहे. ही कामगिरी म्हणजे एक महत्त्वपूर्ण क्षण असल्याचे नमूद करीत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे की, आत्मनिर्भर भारताचे हे शानदार उदाहरण असून पंतप्रधानांच्या ‘संकल्प से सिद्धी’ या वचनानुसार प्राप्त झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प निर्धारित वेळेच्या चार वर्षं आधीच भारताने पूर्ण केला आहे, असे पर्यावरण मंत्र्यांनी सांगितले. ताज्या गणनेनुसार देशात सुमारे 2967 वाघ आहेत. यामुळे जागतिक व्याघ्र संख्येच्या 75% वाघांचे वसतिस्थान भारत आहे. 2022पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचा सेंट पीटर्सबर्ग येथे 2010मध्ये केलेला संकल्प भारताने आधीच पूर्ण केला आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संकेतस्थळावर उल्लेख आहे की, “सन 2018-19मध्ये केलेले सर्वेक्षण हे संसाधन आणि माहिती या दोन्ही गोष्टी संग्रहीत करण्याच्या दृष्टीने आजपर्यंतचे सर्वात व्यापक सर्वेक्षण होते. वेगवेगळ्या 141 क्षेत्रात 26,838 ठिकाणी कॅमेरे (एखादा प्राणी जवळून गेल्यावर त्याचे छायाचित्र आपोआप टिपणारी सेन्सर लावलेली छायाचित्रण उपकरणे) बसविण्यात आले होते आणि त्याद्वारे 121,337 चौरस किलोमीटर (46,848 चौरस मैल) क्षेत्रफळाचे प्रभावी सर्वेक्षण करण्यात आले. या सापळारूपी कॅमेऱ्यांनी वन्यजीवांची 34,858,623 छायाचित्रे हस्तगत केली (त्यातील 76,651 वाघ आणि 51,777 बिबट्या होते; बाकीचे इतर स्थानिक प्राणी होते). या छायाचित्रांमधून, पट्ट्यांच्या नमुन्यानुसार प्राणी ओळखण्याच्या सॉफ्टवेअरद्वारे 2,461 वाघ (छावा वगळता) ओळखले गेले.
कॅमेराचा अभूतपूर्व वापर तसेच 2018 भारतातील वाघांची स्थिती या मूल्यांकनानुसार 522,996 किलोमीटर (324,975 मैल) क्षेत्रावर चाचण्यांसाठी व्यापक प्रमाणावर पावलांचे ठसे आणि त्यांचे खाद्य व विष्ठा यासाठी 317,958 निवासी नमुने घेण्यात आले. अंदाजे एकूण 381,200 चौ.कि.मी. (147,181 चौरस मैल) वन क्षेत्रफळावर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वाचा एकत्रितपणे माहितीसंग्रह आणि आढावा सुमारे 620,795 कामगार दिनाइतका आहे.
चार वर्षांतून एकदा होणारी राष्ट्रीय व्याघ्र गणना ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे भारतीय वन्यजीव संस्थेच्या तांत्रिक सहकार्यातून राबविण्यात येत असून राज्य वनविभाग व हितधारक त्याची अंमलबजावणी करीत आहेत. 2018च्या ताज्या गणनेनुसार भारतात अंदाजे 2967 वाघ आहेत. त्यापैकी 2461 वैयक्तिक वाघांचे फोटो टिपले गेले आहेत, जे एकूणच वाघाच्या संख्येपैकी 83% असल्याने सर्वेक्षणाच्या व्यापकतेवर ते प्रकाश टाकतात. नऊ व्याघ्र क्षेत्रांवर सुरू करण्यात आलेला प्रोजेक्ट टायगरसारखा प्रजाती विशेष कार्यक्रम आता 50 व्याघ्र क्षेत्रांवर सुरू असून जगातील अशाप्रकारचा क्वचितच समांतर कार्यक्रम असेल. व्याघ्र संवर्धनात भारताने आघाडीची भूमिका निभावली असून भारताच्या प्रयत्नांकडे जगभरात आदर्श म्हणून पाहिले जाते.
“