‘जिथे सागरा धरणी मिळते..
तिथे तुझी मी वाट पाहाते…!’
अशा अवीट गोडीच्या असंख्य सुंदर सुमधुर गाण्यांमधून, कथा-कादंबऱ्यांतून, चित्रांतून, सिनेमातील दृश्यांतून, अनादी अनंत काळापासून समुद्र मानवी मनाला साद घालीत आला आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊन लाटांची निरंतर गाज ऐकत राहणे, पाण्याने चिंब भिजून लाटांना आपल्या अंगाखांद्यावर लडिवाळपणे खेळविणे, ओल्या वाळूत शंख-शिंपले शोधणे, समुद्रावरील भन्नाट वारा उरात घेणे… हा माणसाच्या जीवनातील विलोभनीय आनंदाचा अपार ठेवा आहे आणि म्हणूनच समुद्र हा माणसाचा खरा मित्र ‘सागरसखा’ आहे, असं मत व्यक्त केलं आहे ‘महासागर- समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख’ या पुस्तकाचे संपादक रविराज गंधे यांनी…
अंदाजे ४०० कोटी वर्षांपूर्वी महासागरात जिवाणू जन्माला आला! नंतरच्या काळात उत्क्रांती होत जीवसृष्टी निर्माण झाली. खऱ्या अर्थाने जिवाणू हेच आपले आद्यजीव! सागराच्या अंतरंगात एक सुंदर, नयनरम्य अन् आश्चर्यकारक अशी विविधतेने नटलेली जीवसृष्टी वसली आहे. आपण ज्या हवेत श्वास घेतो त्यातील ६० टक्के ऑक्सिजन हा समुद्रातील वनस्पती अन् प्लवकांद्वारे हवेत सोडला जातो. समुद्र हाच माणसाचा खरा श्वास आहे! समुद्र हा पृथ्वीवरील वातावरणातील प्रदूषणामुळे प्रचंड प्रमाणात निर्माण होणारा कार्बनडायोक्साईड अन् उष्णता शोषून घेऊन पृथ्वीचं तापमान नियंत्रित करतो.
अशा ह्या जीवनदायी समुद्राचं अस्तित्त्व वाढतं प्रदूषण, तापमान अन् मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलं आहे. मानवी प्रदूषणामुळे आज सागराचाच प्राण तळमळून कंठाशी आला आहे. गेल्या काही दशकांपासून महासागरातील नैसर्गिक संपत्ती अन् खनिजाच्या हव्यासापोटी माणसानं विकासाच्या नावाखाली खोल समुद्रात अन् किनाऱ्यावर प्रचंड धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे. समुद्राच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे तीव्र तापमान बदल, अतिवृष्टी, वादळे, भूस्खलन अशा असंख्य नैसर्गिक आपत्तींना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. आज जगासमोर, आपापल्या देशातील समुद्र अन् किनारे वाचवण्याचं मोठं आव्हान आहे. विकास हवाच आहे पण तो पर्यावरणपूर्वक असणं गरजेचे आहे. ह्या पुस्तकाच्या निमित्ताने समाजामध्ये समुद्रसाक्षरता निर्माण व्हावी अशी अपेक्षाही गंधे यांनी व्यक्त केली आहे.

‘महासागर- समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख’ या पुस्तकात सात प्रकरणे आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये ५१ लेखांचा समावेश आहे.
ही सात प्रकरणे पुढीलप्रमाणे आहेत-
१) समुद्रसाक्षरता- चार लेख
२) भौतिक समुद्रशास्त्र- सात लेख
३) रासायनिक समुद्रशास्त्र- तीन लेख
४) जैविक समुद्रशास्त्र- बारा लेख
५) समुद्रसंबधित संस्था- आठ लेख
६) मानव-संबंध आंतरसंबंध- सहा लेख
७) महासागर – कुतूहलाच्या गोष्टी- ११ लेख
या प्रकरणांतील हे सगळे लेख विविध मान्यवरांनी लिहिले आहेत. सुंदर मुखपृष्ठ असलेले आणि समुद्रावर मराठीमध्ये कदाचित एवढं विस्तृतपणे प्रसिद्ध झालेले हे पहिलेच पुस्तक असेल.
महासागर – समुद्रविज्ञानाची परिपूर्ण ओळख
संकल्पना: रविराज गंधे
संपादन: रविराज गंधे, डॉ. नंदिनी देशमुख
प्रकाशक: नवचैतन्य प्रकाशन
मूल्य: ४०० रुपये / पृष्ठे- २६०
सवलतमूल्य: ३६० रुपये
टपालखर्च: ४० रुपये
बालकुमारांसाठी खास ‘संपूर्ण कथारामायण‘!
देशभरात काल रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. रामनवमीच्या निमित्ताने बालकुमार वाचकांसाठी खास ‘संपूर्ण कथारामायण’ या पुस्तकाची माहिती अगदी थोडक्यात…

श्रीरामचरित्राचे वाचन आणि श्रवण या देशात शतकानुशतके चालू आहे. रामकथेचं सौंदर्य आणि थोरवी स्वयंभू आहे. तिची अनुकृती घडवणाऱ्यांचे हात तिच्या पुनः प्रकटीकरणाने धन्य होतात. आदिकवींचा मर्यादा पुरुषोत्तम असलेला ‘श्रीराम’ आजवर कित्येकांनी कित्येकदा निरनिराळ्या माध्यमांतून पुनःपुन्हा सांगितला आहे, अजूनही सांगत आहेत. पण खास कुमारांसाठी रामायणकथेची आणखी एक सुबक प्रतिमा प्रसिद्ध लेखक वि. के. फडके यांनी घडवली. १९७१मध्ये वाचकांनी गौरवलेले हे संपूर्ण रामायण पुन्हा एकदा आपल्या भेटीला…
संपूर्ण कथारामायण
लेखक: वि. के. फडके
प्रकाशक: डायमंड पब्लिकेशन्स
मूल्य- ३९९ ₹. / पृष्ठे- २४२ (मोठा आकार)
टपालखर्च- ३१₹.
एकूण- ४३० ₹.

पुस्तक खरेदीसाठी संपर्क– ग्रंथ संवाद वितरण (8383888148)