Tuesday, April 15, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजम्हणे काही सेकंदांत...

म्हणे काही सेकंदांत दुसरी लोकल येणार!

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई भेटी वाढल्या आहेत. बरोबरच आहे, येत्या काही महिन्यांत (सहा महिन्यांत) मुंबई महापालिकेसह राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या भेटीबाबत आक्षेप घेण्याचे कारणच नाही, कारण त्यामुळे का होईना निदान काही रेल्वेस्थानके तरी चकाचक होतात. वास्तविक गेल्याच भेटीत मंत्र्यांनी मुंबईतील लोकल गाड्यांची संख्या वाढवणार आहोत असे सांगितले होते. काल पुन्हा त्यांनी लोकल फेऱ्यांत भर पडेल, तसेच लवकरच ‘जलद प्रवासाचे कवच’ प्राप्त होईल अशा घोषणा केल्या आहेत. घोषणा करायला काय जाते हो… बाबा खातो बारा वडे… पण तळणारा कुठे आहे? तशातली गत आहे ही!

लोकल

अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून ही घोषणा केली असेल असे जरी मानले, तरी उच्चविद्याविभूषित मंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना काही प्रतिप्रश्न विचारून त्या आकडेवारीतील हवाच काढून टाकता आली असती. पण हल्लीचे मंत्री असे करणारे नाहीत. कारण, त्यांना प्रत्येक गोष्टीचा ‘इव्हेंट’ करायचा असतो. आता ‘इव्हेंट’ म्हटले की विचारांना सूट देणे किंवा तो अजिबातच न करणे ओघाने आलेच. याचे उदाहरण म्हणून त्यांनीच सांगितलेले ‘सुमारे तीन मिनिटावर’ आणलेले दोन लोकल्समधील अंतर! अहो मंत्रीमहोदय तीन मिनिटे जरा बाजूला ठेवा, गेल्या दीड वर्षांपासून मुंबईच्या तिन्ही रेल्वेवर सुमारे १५/२० मिनिटांच्या विलंबाने लोकल्स धावत आहेत. (धावत कसल्या.. धापा टाकत येत आहेत.) आणि वादाकरीता मान्यही करूया की, तीन मिनिटांत लोकल्स आली. अरे पण त्या गाडीतून उतरणारे प्रवासी अवघ्या तीन मिनिटांत फलाटावरून जाऊ शकतात का? फलाट काहीसा रिकामा तर मिळाला पाहिजे, की प्रवाशांना लगेचच उचलून दूर नेण्यासाठी काय वेगळी महाकाय क्रेन आणणार आहेत काय? काय.. विचार वगैरे करायला डोकं आहे की नाही? की गाडीने फक्त माणसं आणून टाकावीत व नंतर ती चेंगराचेंगरीत मरावीत असे तर अधिकाऱ्यांना वाटत नाही ना? हे प्रवासाचे कवच आहे की माणसांना मारायचे आयते कवच आहे याचा जाब त्या अधिकाऱ्यांना विचारला पाहिजे.

रेल्वे विभागाने लोकल्सच्या माध्यमातून मुंबई आणि आसपासच्या विभागाची सेवाच केलेली आहे हे विसरता येणं शक्य नाही. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून लोकल सेवा डबघाईस नाही, पण ढेपाळाली नक्कीच आहे, हे अधिकारीवर्गही खासगीत मान्य करतो. यांचे एकमेव कारण म्हणजे रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी मुंबईतल्या कुलाब्याच्या बधवार पार्क येथे राहत असल्याने लोकल्स प्रवासाचा काय त्रास असतो याची त्यांना कल्पनाच नसते. त्यांना जर दररोज ठाण्याहून वा विरारहून सीएसटी वा चर्चगेटला यावे लागले असते तर त्यांना कदाचित थोडी जाणीव असती. शिवाय मुंबई प्राधिकरणात वाढणारे लोंढेही यास प्रामुख्याने जबाबदार आहेत. पोटापाण्यासाठी ही मंडळी मुंबई व आसपासच्या परिसरात येतात. गेल्या काही वर्षांपासून मेट्रो रेल्वेचे जाळे वाढत आहे. चांगली गोष्ट आहे. पण परिसराचा विचार करता केवळ चारच डबे, ही भयंकर डोकेदुखी आहे. या चार डब्यांतून गर्दीच्या वेळेस प्रवास करणे लोकल्स प्रवासापेक्षा धाडसाचे आहे. फक्त वातानुकूलीत यंत्रणा आहे म्हणून प्रवासी जिवंत राहतात. अन्यथा ते गुदमरून मेलेच असते इतकी वाईट अवस्था आहे.

प्रवासाची जोडणी उत्तम झाल्याची फुशारकी मारली जाते. उदाहरण म्हणून अंधेरी मेट्रोने मध्य व पश्चिम जोडले गेले असे राजकीय नेते सांगत फिरत आहेत. पण अंधेरीला मेट्रोने उतरल्यावर सुमारे पाऊण (काहीवेळा तर अधिकच.. सुमारे सव्वा किलोमीटर) किलोमीटरची पायपीट करावी लागते. गर्दीच्या वेळी तर जीव मेटाकुटीला येतो. हीच गत गुंदवली स्थानकात जाताना होते. तेथेही बरेच चालावे लागते व नंतर दिंडोशी वा नॅशनल पार्कला जाणारी मेट्रो मिळते. ही वा अशी स्थानके उभारताना केलेल्या नियोजनात याचा विचार झालाच नसावा असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. मेट्रोच्या स्थानकावर जाण्यासाठी वा रेल्वेस्थानकावरून मेट्रोकडे जाण्यासाठी विमानतळावर असतात तसे सरकते रस्ते बांधण्याबाबत नियोजनकर्ते का विचार करत नाहीत हा मला पडलेला प्रश्न आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून तिन्ही रेल्वेमार्गांवर सुटीच्या दिवशी ब्लॉक वा मेगाब्लॉक घेतले जात आहेत. दुरुस्ती व देखभालीसाठी याची गरज असली तर हे आता अति होत असल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांची आहे. त्याला कारणही तसेच आहे. सुटीच्या दिवशी सामान्यजन कुटुंबासाह बाहेर पडत असतो. त्याला यामुळे सहकुटूंब हाल सोसावे लागतात. गेल्या काही वर्षांपासून रेल्वेमंत्री वा दिल्लीच्या अधिकाऱ्यांच्या मुंबई भेटीच्या वेळी प्रवासी संघटनाच्या प्रतिनिधींना डावलले जात अस्सल्याची तक्रार संघटनांनी केली आहे. प्रवाशांना काय त्रास होतो हे अधिकाऱ्यांपेक्षा संघटनांनाच अधिक माहित असतो. रेल्वेचे सहापदरी मार्ग वापरात येऊ लागल्यापासूनही लोकल्सना विलंब होतच आहे, कारण सहापदरी मार्ग कल्याणपर्यंत झाला. परंतु कल्याणनंतर त्याचे सुनियोजन झालेच नाही, अशी तक्रार काही अभियंत्यांनी या प्रतिनिधीशी बोलताना केली. तसेच मशीद बंदर स्थानक सोडल्यानंतर अजूनही गाडी पाच ते दहा मिनिटे मध्ये थांबतेच. हे कशाचे द्योतक आहे? ठाणे रेल्वेस्थानकाबाबतही बरेच लिहिण्यासारखे आहे. स्थानकाचा विस्तार होत आहे. चांगली गोष्ट आहे. पण विस्ताराबरोबर पुलांचेही रुंदीकरण नको का? मुलुंड रेल्वेस्थानकातील दुरुस्ती अजून किती वर्षे चालणार? मालाड रेल्वेस्थानकाची दुरुस्तीही सुमारे दहा वर्षे लटकलेली आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास सचिव व मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रसंगी काहींची झाडाझडती घेऊन मुंबईच्या या तिन्ही रेल्वे रुळावर आणव्यात. इतके झाले तरी मिळवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

‘माईंड युअर बिझिनेस’ सांगणारे पवार व ‘ऑफ द रेकॉर्ड’ सांगणारे सचिव!

संध्याकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास मंत्रालय प्रवेशाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर आस्मादिक गारेगार प्रेसरूममध्ये प्रवेश करते झाले. ज्येष्ठ पत्रकार राम पवार व राजेश पुरंदरे याआधीच तेथे आलेले होते. आम्ही पाणी पिऊन ताजेतवाने होईस्तो ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक आमच्यात सामील झाला....

का झाली महाराष्ट्र भाजपची बोलती बंद?

'इंडिया टुडे' या देशातील प्रख्यात साप्ताहिकाने औरंगजेब कबरीसंदर्भातील वादावर आधारित कव्हरस्टोरी केली आहे. समतोल आहे, सर्व संबंधितांच्या प्रतिक्रिया आहेत. कबर खणून काढणारेही आहेत तसेच कबरीच्या बाजूनेही बोलणारेही आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर आम्ही कबर हटवण्याबाजूचेच आहोत असे ठासून...

राजकीय उणीदुणीच काढायची तर अधिवेशन कशाला हवे?

राज्य विधिमंडळाचे सर्वात रद्दड अधिवेशन मुंबईत नुकतेच समाप्त झाले. राजकीय उणीदुणीच काढायची तर अधिवेशन कशाला, सार्वजनिक 'नळ' शोधा. पुढे पुढे दिवस आणखी कठीन येत जातील! कवींना सुचणार नाहीत कविता.. लेखक लेखिका ठेवू लागतील वांग्मयाशी फक्त वांग्मयबाह्य संबंध.. (महेश केळुस्कर) या कवितेच्या शेवटच्या दोन ओळीत...
Skip to content