Homeन्यूज अँड व्ह्यूज.. म्हणे एसटीच्या...

.. म्हणे एसटीच्या आगारे एअरपोर्टच्या लाऊंजसारखी करणार!

महाराष्ट्राच्या परिवहन मंत्रिपदाची धुरा हाती आल्यापासून प्रताप सरनाईक यांनी एसटी सेवा सुधारण्याबात अनेक घोषणा करण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यांच्या ‘विमान’सेवेचे प्रेम लक्षात घेता अनेक एसटी बसेसची आगारे आम्ही विमानतळासारखी चकाचक करू अशीही त्यांनी घोषणा केली आहे. त्यांच्याच शब्द वापरायचा झाल्यास एसटी डेपो ‘लाऊंज’सारखी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यात चुकीचे काही आहे असे वाटतं नाही. परंतु एसटीची विविध ठिकाणी असलेली आगारे किंवा एसटीच्या कार्यशाळांची सध्याची परिस्थिती पाहता परिवहन मंत्र्यांच्या घोषणा व सद्यस्थिती यात जमीनअस्मानाचे अंतर आहे.

उदाहरणादाखल त्यांच्याच ठाणे शहरातील खोपट एसटी आगाराचे देता येईल. या एसटी आगाराच्या दरवाजातून आत जाण्यासाठी आटापिटा करावा लागतो. कारण, तेथे दिवसाचे चोवीस तास कुणाच्या ना कुणाच्यातरी खासगी मोटारगाडया पार्क केलेल्या असतातच. अधिकाऱ्यांच्या गाड्या कार्यालय आवारात सुलभरीतीने नेता याव्यात म्हूणन तेथे स्लोपही तयार केलेला आहे. ते

तर एक वेळ बाजूला ठेवू. या आगाराच्या पायऱ्यांवर नेहमीच कुणी भिकारी, कुणी गर्दुल्ला बसलेला दिसेलच. रात्री नऊ वाजल्यानंतर तर तेथे समाजकंटाकांचा अड्डाच असतो.. याच आगाराच्या मागील बाजूस नामदेव वाडीत एसटीची मोठी कार्यशाळाही आहे. तिची तर दुर्दशा पाहवत नाही. तेथे एसटीची एक ‘अश्वमेध’ गाडी चक्क दहा वर्षे ‘रुतून’ आहे. हे जणू सध्या एसटीचे प्रतीकच बनून राहिले आहे की काय असे वाटते!

‘गाळात रुतलेली’ एसटी.. कर्मचाऱ्यांच्या प्रसाधनगृहाचे तर दशावतार झाले आहेत. कामगारांना हातपाय धुवायलाही नीट जागा नाही तर नैसर्गिक विधींसाठीतरी योग्य जागा कशी मिळेल, असा प्रतिसवाल एका कामगारांने केला. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि परिवहन मंत्री सरनाईक यांनी सरकारी लवाजमा न घेता खाजगी पाहणी दौरा करावा, असे आमचे आवाहन आहे. तशीच पाहणी ठाणे रेल्वेस्थानकाच्या परिसरात (प) असलेल्या एसटी आगाराचीही केली जावी. तेथील खंडहर बनलेल्या इमारतीकडे कुणाचेच लक्ष नाही. गरीब बिचाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावरही कसलेच छपर नाही. हे आधी तयार करा आणि मग ‘लाऊंज’च्या गप्पा मारा!

छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर

Continue reading

कुठेकुठे मुंबई आहे हे मतदानानंतरतरी कळावे!

तब्बल सात वर्षानंतर उद्या मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. आता मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीत काय होईल, काय नाही यांचे काही अंदाज माध्यमे आणि वर्तमानपत्रांनी वर्तवलेले आहेत. हे अंदाज खरे की खोटे हेही अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे....

अनुभव घ्या एकदा रात्रीच्या ठाण्याचा!

आमचं ठाणे शहर तस निवांत कधीच नसतं. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रींनंतर साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्राळविक्राळ पसरलेले शहर काहीसा मोकळा श्वास घेऊ लागते. तेही काही तासच.. कारण ट्रक्स आणि भले मोठे कंटेनर्स रस्त्यावरून वाहतच असतात! हीच वेळ साधून आज...

पंकजराव, ठाणेकरांना असते शिस्तीचे कायम वावडे!

मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली व पुणे आदी महापालिकांच्या निवडणुका होणार हे सरकारने जाहीर केल्यापासून जवळजवळ सर्वच माध्यमे तसेच मराठी वर्तमानपत्रे कधी नव्हे ते शहराच्या नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. हे चांगले घडत आहे कारण, राज्याचे राजकारण,...
Skip to content