काल रात्री उशिरा ठाणे शहरात घोडबंदर रोड, चितळसर पोलीसठाण्याच्या परिसरातील वाडेकर हाऊस परिसर आणि ढोकाळी नाक्यावर राहणारा मी, यांच्यात लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजावरून लपाछपीचा संतापजनक खेळ सुरु होता. अखेर हा खेळ रात्री पावणेदोन वाजता पोलिसांच्या हस्तक्षेपाने लाऊडस्पीकर व डीजे बंद करून संपला. येथे आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाने दिलेले तत्पर सहाय्य! नाही तर आपण सर्वजण या ना त्या कारणाने पोलिसांच्या नावाने बोटे मोडीत असतो. पण काल मला सुखद अनुभव आला हे सांगायला हवेच.
काल संध्याकाळी व रात्री जोरदार पाऊस पडून गेल्याने वातावरणात सुखद गारवा होता. नेहमीप्रमाणे वाचनवगेरे संपवून मी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झोपायला गेलो. तो तेथे घोडबंदर रोडच्या पलीकडून गाण्यांचा मोठा आवाज येत होता. दोन-तीन मिनिटे आवाज ऐकल्यानंतर मी ठाणे पोलीस आयुक्तांच्या मेसेंजरवर संदेश पाठवून आवाजाबाबत तक्रार केली. दहा मिनिटांनी पुन्हा संदेश पाठवला की आवाज अजून येतोच आहे. त्यानंतरही पंधरा मिनिटे गेली. पोलिसांची जलद हालचाल, आवाज कमी होत नाही हे पाहून नाईलाजाने नियंत्रण कक्षाच्या १०० क्रमांकावर फोन केला. प्रतिसाद लगेच मिळाला. माझा पत्ता समजताच त्यांनी कापूरबावाडी पोलीसठाण्यातून आपल्याशी संपर्क साधण्यात येईल त्यांना तुमची माहिती द्या. आमचा राईडर घोडबंदर रोडच्या दिशेने रवाना करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

हायसे वाटले. पोलीस काहीतरी हालचाल करतायत म्हटल्यावर बर वाटतं. तोच घोडबंदरवरून हवालदार दादांचा फोन आला. त्याला खाणाखुणा सांगितल्यावर तो म्हणाला दादा ‘हे आमच्या हद्दीत नाही, चितळसरच्या हद्दीत येते.’ पुन्हा मी चिंतेत.. आता काय करायचे? पण त्यांनीच मला चिंतामुक्त केले. आम्ही चितळसर पोलीसठाण्याला कळवले आहे, ते तुम्हाला फोन करतील. हायस वाटलं. तोच चितळसरमधून स्वप्नील गडशे यांचा फोन आला. स्वप्नील यांनी सूत्रे हाती घेताच वेगाने हालचाली घडल्या. त्यांनी दोन हवालदारांना पिटाळले, तरी त्यांना शोध लागेना! अखेर स्वप्नील यांनी बाईक काढली. माझ्याशी फोनवर संपर्क करत ते इच्छित स्थळी पोहोचले. त्यांना दरवाजात पाहताच ‘जादूच्या छडी’प्रमाणे लाऊडस्पीकर / डीजेचा आवाज एकदम छू.. झाला. सारं कस शांत शांत झालं! स्वप्नील यांचे आभार मानले व मी झोपायच्या तयारीला लागलो. तेव्हा पावणेदोन वाजले होते.
आज या मोठ्या आवाजाचे कूळ शोधताना असे समजले की, आलिशान गाड्यांचा शो रूम असलेल्या वाडेकर सदनाच्या परिसरात ‘हळदी’ समारंभ होता. आता ठाणे शहर व मुलुंडच्या काही भागात हळदी समारंभ म्हटला की रात्रीचे किंवा पहाटेचे किती वाजतील ते काही सांगता येत नाही. खरंतर सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा वाजण्याची मर्यादा घालण्याअगोदर या हळदी समारंभाच्या आयोजकांशी चर्चा करायला हवी हॊती. (खरेतर या समारंभावर करण्यात येणारा वारेमाप खर्च लक्षात घेता हळदी समारंभ नॉईस टाईट हॉलमध्ये घेणे गरजेचे वाटू लागले आहे) या हळदी समारंभाप्रमाणेच ठाण्यात केव्हाही फटाके फोडण्यात येतात, त्यावरही काही निर्बंध घालता येऊ शकतो का याबाबत गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा.
छायाचित्र मांडणीः प्रवीण वराडकर