प्रगतिशील उद्योगपती- शास्त्रज्ञ डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचं कार्यचरित्र अनुराधा परब यांनी त्यांच्या जीनियस जेम डॉ. जीएम, या पुस्तकात शब्दबद्ध केले आहे. नुकतेच ते माझ्या वाचनात आले. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबईचे कुलपती आणि मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज बी. जोशी या पुस्तकाबद्दल लिहितात-
“सूक्ष्मजीवशास्त्र त्याचबरोबर उद्योजकीय कौशल्य आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदान अशा विविध व्यापक स्तरांवर डॉ. जी. एम. वारके यांचे कार्यचरित्र महत्त्वाचे आहे. साइटोफागा जिवाणूंच्या विविध प्रजातींची ओळख तसेच त्यांचे विलगीकरण यामधील त्यांच्या मूलभूत संशोधनाने सूक्ष्मजीवशास्त्राच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. या जिवाणूंच्या प्रजातींच्या लक्षणांचे तपशीलवार वर्णन आणि त्यांच्या विलगीकरणासाठी आवश्यक विशेष मीडिया निर्मितीद्वारे त्यांच्यातील वैज्ञानिकाने आपल्या समर्पित वृत्तीचेच दर्शन घडवले. इतकेच नव्हे तर, त्यांच्या या पायाभूत संशोधनाने भविष्यातील संशोधनाचा आणि औद्योगिक क्षेत्रातील उपयोजनांचा मार्गच प्रशस्त केला.
डॉ. वारके यांच्या या कार्यामुळे औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनाच्या क्षेत्रातदेखील नव्या संधींची दालने खुली झाली आहेत. त्यांच्या सर्वस्वी नव्या दृष्टिकोनामुळे अनेक औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सुलभता आल्याने त्याचा आर्थिकदृष्ट्या व्यापक परिणाम दिसून आला आहे. त्यांचे औद्योगिक संशोधन आणि त्याद्वारे निर्मिती झालेले उत्पादन तंत्रज्ञान आजही उद्योजक तसेच उद्योगांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांचे हे चरित्र त्यांच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक यशाचे गमक सांगतानाच भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याचेही काम करते. सूक्ष्मजीवशास्त्र आणि उद्योगविश्वात त्यांनी निर्माण केलेल्या समृद्ध वारशाचा फायदा जागतिक आरोग्य, विज्ञान आणि उद्योग क्षेत्राला झाला असून त्याबद्दल सर्वत्र त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त केली जाते. देशाला, समाजाला आपले अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. जी. एम. वारके यांचे चरित्र तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अवश्य वाचावे. त्यातून प्रेरणा घेत नवनिर्मिती करत देशाच्या समृद्धीला आपलाही हातभार लावावा, असे यानिमित्ताने मी सुचवू इच्छितो.
या पुस्तकाच्या लेखिका अनुराधा परब आपल्या प्रस्तावनेत म्हणतात की-
ही गोष्ट अशाच एका ध्येयवेड्या व्यक्तीची. आकाशाला गवसणी घालूनही मातीचेच पाय असणाऱ्या जीनियस जेमची (हिऱ्याची), अर्थातच डॉ. गंगाधर मोतीराम वारके उर्फ डॉ. जीएम यांची. संघर्ष निसर्गाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. तो झाडावेलींना, पशुपक्ष्यांना चुकला नाही, तर मानवाला तरी कसा काय चुकणार? गगनभरारी कधीही सहजसोपी नसते. ती अडथळे, समस्या, संकटे, विरोध, स्पर्धा, चढउतार अशा एक ना अनेक खाचखळग्यांची मालिकाच असते. या सगळ्यांवर अंगभूत धैर्याने, धाडसाने, बुद्धिचातुर्याने मात करत संपादलेले यश हे कौतुकास्पद असते. डॉ. गंगाधर मोतीराम वारके यांचे कार्यचरित्र हेदेखील असेच रोचक, रंजक आणि नव्यांना उद्बोधक ठरणारे आहे. विशेषतः गावखेड्यातील मुलांसाठी डॉ. जी. एम. वारके यांचा हा जीवनसंघर्ष एखाद्या दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरेल. माणूस जन्म कुठे घेतो यापेक्षा तो आपली प्रगाढ इच्छाशक्ती, अपार मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर आपल्या स्वप्नाला सत्यामध्ये कसे आणू शकतो, याचे हे कार्यचरित्र बोलके उदाहरण ठरावे. वृत्तीने संशोधक आणि आचार-विचाराने द्रष्टा व्यावसायिक हे आगळे समीकरण या एका व्यक्तीच्या ठायी पाहायला मिळते. फार्मा क्षेत्रातील मीडिया उत्पादनामध्ये भारताला स्वयंपूर्ण करण्याचे स्वप्न ऐंशीच्या दशकात पाहणारे आणि त्यासाठी अहोरात्र काम व संशोधन करणारे हे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व. औषध-उत्पादन क्षेत्रातील मीडिया उत्पादनांच्या आयातीद्वारे परदेशात जाणारा भारतीय पैसा रोखायचा असेल, तर परदेशस्थ कंपन्यांवरील अवलंबित्व संपवले पाहिजे; त्यासाठी भारताला मीडिया उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण व्हावे लागेल, हे चाणाक्षपणे जाणलेल्या आणि त्याप्रमाणे स्वसंशोधनातून निरनिराळे मीडिया उत्पादित करण्यासाठी आयुष्य झोकून दिलेल्या एका कर्मयोग्याचे हे कार्यचरित्र आहे. आज एकविसाव्या शतकामध्ये एका द्रष्ट्या संशोधक-व्यावसायिकाने हायमीडिया लॅबोरेटरीज् प्रा. लि. कंपनीच्या सुमारे पन्नास वर्षांच्या यशस्वी वाटचालीतून अनेक नवोदित उद्योजकांना, संशोधक-वैज्ञानिकांना मार्ग प्रशस्त करून दिला आहे. आपल्या अनुभवांच्या माध्यमातून डॉ. जीएम यांनी पुढच्या पिढ्यांसाठी आशादायी चित्र समोर ठेवलेले आहे.

मी डॉ. जीएम यांच्या जगण्याचा संघर्ष पाहते, तेव्हा कधीही कच न खाता भरारी घेण्याची त्यांची विजिगिषु वृत्ती पाहून अचंबित होते. लहानपणी वाचलेली आणि कायमची मनावर कोरली गेलेली कष्टकरी मुंगीची गोष्ट, तिची चिकाटी, परिश्रम करण्यातील सातत्य यांचीच आठवण होत राहते. संत ज्ञानेश्वरांनी सूर्याला गिळण्याची क्षमता राखणाऱ्या त्या इवल्याशा मुंगीचा दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिला तो तिच्यातल्या अशा असामान्य गुणांमुळेच. अथक या शब्दाचा अर्थही तिच्याचकडून शिकावा, इतके तिचे माहात्म्य आणि वेगळेपण. तेच गुण आपल्याला डॉ. जीएम यांच्यामध्येही दिसून येतात.
डॉ. जी. एम. वारके आपल्या मनोगतात लिहितात-
हायमीडियाच्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांतून, मदतीच्या माध्यमातून आम्ही वारके कुटुंबीय नेहमीच सक्रिय राहिलेलो आहोत. वेळप्रसंगी कार्यशाळांमधून उमेद वाढवण्यासाठी, प्रोत्साहनपर व्याख्यानंही मी दिली आहेत. मात्र स्वतःच्याच कार्यचरित्रासाठी व्यक्त होणं, आत्मस्तुती करणं हे काहीसं अवघड काम मला वाटत होतं. अनुराधा परब यांनी हे कामही लेखिका म्हणून सोपं केलं. मोकळ्या, उत्स्फूर्त संवादाच्या माध्यमातून, लिखाणाच्या मांडणीतून त्यांनी माझ्या ऐंशी वर्षांच्या जीवनाचा आलेख व्यवस्थित जुळवून आणला. मी कायमच प्रयत्नवादी होतो आणि आहे, याचा प्रत्यय या पुस्तकातून नक्कीच येईल. हे मी आत्मगौरवासाठी सांगत नसून वाचणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांची उमेद आशा अधिक बळकट व्हावी, या हेतूने मांडत आहे. माणसाचा जेव्हा स्वतःवर ठाम विश्वास असतो तेव्हा त्याच्या प्रयत्नांना कधीच खीळ बसू शकत नाही, हे माझे अनुभवाचे बोल आहेत. या कार्यचरित्रातून प्रेरणा घेऊन देशाच्या प्रगतीला हातभार लावणारे युवा निर्माण झाले, तर त्याचा अतीव आनंद होईल, किंबहुना या चरित्राचं सार्थक झालं, असंच मला वाटेल.
चरित्र हे जरी एकट्याचं असलं तरीसुद्धा अनेकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ते साकारत असतं. माझ्याही आयुष्याचे असे खंदे, आश्वासक खांब आहेत. त्यांच्यावर किंवा त्यांनी आपणहून एखादी जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी त्यावर विसंबून माझ्या संशोधनामध्ये, व्यवसायाच्या अन्य निर्णायक बाबींमध्ये व्यग्र राहू शकत होतो आणि राहत आलो आहेही. यामध्ये माझे जन्मदाते, माझे मोठे आणि धाकटेही बंधू, माझी सहधर्मचारिणी, भावजय, माझे मेहुणे, काही जिवाला जीव देणारे कार्यकर्ते इत्यादींचा कृतज्ञतेने आवर्जून उल्लेख करावा लागेल.
जीनियस जेम डॉ. जीएम
लेखिका: अनुराधा परब
प्रकाशक: रोहन प्रकाशन
पृष्ठे: ३५६ / मूल्य: ४२५/- रुपये

संपर्कः ग्रंथ संवाद वितरण (8383888148)