Thursday, November 21, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटइतिहास पुसून टाकता...

इतिहास पुसून टाकता येत नाही, फक्त विसरता येतो!

इतिहास पुसून टाकता येत नाही, बदलताही येत नाही, मात्र… इतिहास विसरता येतो! हाच विसरलेला इतिहास सांगण्याचे काम बाबू गंजेवार यांनी केला आहे. कोणता इतिहास आपण विसरलो? तो इतिहास आहे हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक लखलखते पर्व म्हणजे हैदराबाद मुक्तिसंग्राम। बघता बघता ७५ वर्षे झाली, जुन्या पिढीच्या स्मृती अंधूक झाल्या. त्यानंतरच्या पिढीला थोडे थोडे आठवते आणि नवीन पिढीला तर सांगावे लागते! संपूर्ण भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याच्या अनोख्या नवलाईत न्हाऊन निघत होता आणि हैदराबाद संस्थानची प्रजा रजाकाराच्या अनन्वित अत्याचाराखाली भरडून निघत होती. त्यांना स्वातंत्र्याच्या वाऱ्याचा स्पर्श होण्यासाठी आणखी सव्वा वर्ष थांबावे लागले.

भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा लढा तीन प्रकारचा होता. महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या अनोख्या मार्गाने जनजागृती करून स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. नेताजी सुभाष यांनी सरळसरळ सैन्य उभारून ब्रिटिशांशी युद्ध पुकारले, तर क्रांतिकारकांनी हिंसक पद्धतीने शासनाविरुद्ध शस्त्र उचलले. हैदराबाद मुक्तिसंग्राम हादेखील उग्र प्रतिक्रियेचा भाग होता. रजाकारांचा प्रतिशोध म्हणून मुक्तिसैनिकांनी हातात शस्त्र घेऊन निजाम सरकारला तिखट भाषेत उत्तर दिले. हादेखील भारतीय स्वातंत्र्ययुद्धाचा तेजस्वी भाग होता. पण दुर्दैवाने त्याचे नीट मूल्यमापन झाले नाही व उपेक्षेच्या घोर अंधारात हा स्वातंत्र्यसंग्राम अज्ञातवासात गेला!

१७ सप्टेंबर १९४८ रोजी धर्मांध निजामाने भारतीय सैन्यापुढे सपशेल शरणागती पत्करली तेव्हाच मुक्ती मिळाली! तत्कालीन राजकीय गुंतागुंत आणि अगतिकता यातून विलंब होत गेला. पण जुलमी राजवटीविरुद्ध असंतोष खदखदत होता. शेवटी तो लाव्हारस उफाळून वर आला. जशास तसे उत्तर देत जनता चवताळून उठली होती, कारण कासीम रजवीच्या रजाकारांनी अत्याचाराची परिसीमा गाठली होती. हत्त्या, दरोडे, लूट, जाळपोळ, बलात्कार या प्रकारांनी प्रत्येक गावातून थैमान घातले होते. त्या रोमहर्षक संग्रामाचा आणि रजाकारांच्या भयानक अत्याचाराचा समग्र इतिहास कोणी लिहिला नाही. पण त्याच्या खाणाखुणा मात्र शिल्लक आहेत. काही कहाणी रूपात तर काही अवशेष रूपात.

या पुस्तकाची प्रस्तावना प्रा. डॉ. तसनीम पटेल यांनी लिहिली. त्या लिहितात- कोणत्याही व्यक्तीने अत्यंत कठोर आणि निर्ममपणे आपल्या भूतकाळात घडलेल्या कार्याची तटस्थपणे चिकित्सा केली पाहिजे आणि त्याच्यात एवढे धाडस आणि धैर्य असले पाहिजे. १९४८चा मराठवाडा मुक्तिसंग्राम हा मराठवाड्यासाठी अमृतमहोत्सव असला तरी त्याच्या प्राप्तीसाठी जो संघर्ष करावा लागला आणि जे बलिदान द्यावे लागले त्या इतिहासास मूकपणे किंवा तटस्थपणे पाहणे फार वेदनादायी व भयावह आहे हे कुणालाही नाकारून चालणार नाही. परंतु हा भूतकाळ किती अन्यायी व भयावह होता हे मांडण्याचा यशस्वी प्रयत्न लेखक व व्यंगचित्रकार बाबू गंजेवार यांनी आपले छोटेखानी पुस्तक ‘रजाकार’ या पुस्तकात केले आहे. त्यांच्या लेखनाचे कौतुक आपण सर्वांनी केले पाहिजे.

भूतकाळ हा समाज जीवनाचा व आपल्या इतिहास भूगोलाचा लेखाजोखा असतो. इतिहासाला भावनेचा स्पर्श असू शकतो, पण भूगोल व सत्य यांच्या सीमा मात्र पुसता येत नाहीत. विशालकाय भूभाग असलेला भारत देश जेव्हा १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला तो क्षण जगातील सर्वात मोठा स्वातंत्र्यमहोत्सव होता. पण या स्वातंत्र्यमहोत्सवाला भारत-पाकिस्तान विभाजनाच्या वेदनेची गडद अशी किनार होती, जी रक्ताने व हिंसेने स्वातंत्र्याच्या आनंदाला झाकोळून टाकत होती. भारताचा भूगोल बदलण्याचे अनिष्ट प्रयत्न झाले. इतिहासदेखील रक्तरंजित केला गेला. हे कटू वास्तव ध्यानात घेतले पाहिजे.

‘रजाकार’ या पुस्तकाबद्दल लिहिताना भारतीय नौदलातून निवृत्त झालेले कॅप्टन नीलकंठ केसरी लिहितात- हैदराबाद मुक्तिसंग्रामावर उपलब्ध अशी लेखनसंपदा आपल्याकडे एकंदर कमीच. भारताच्या स्वातंत्र्यसमरावर डझनावारी नाही तर शेकडो पुस्तके लिहिली असतील कदाचित. या संग्रामाचा वेध घेणारे बहुतेक सर्व मराठीतील प्रतिभावंत लेखक हे मराठवाडी नव्हते (काही अपवाद वगळता) आणि त्यामुळेच या हैदराबाद मुक्तिसंग्रामासारख्या ज्वलंत विषयावर म्हणावे तितके ग्रंथ प्रसिद्ध झाले नाहीत… किंबहुना! निदान माझ्या तरी वाचण्यात आले नाहीत.

बाबूराव गंजेवारांनी ही उणीव यथाशक्ती भरून काढली आहे. मुक्तीसमरातील प्रत्येक प्रसंग लेखकाने आपल्या प्रतिभेने जिवंत साकारला आहे. पुस्तक वाचताना वाचक खिळून तर राहतोच पण सहजपणे पाऊणशे वर्षांपूर्वीच्या काळात आपण स्वतः आहोत की काय, असा भास निर्माण करण्यात लेखक कमालीचा यशस्वी झालेला आहे. रसाळ वाणीत सांगितलेला हा कांदबरीमय इतिहास, चपखल दख्खनी उर्दूचा समयोचित वापर यांनी आणि एकूणच या गंभीर विषयाची मांडणी केवळ अप्रतिम झाली आहे! म्हणूनच पुस्तक वाचून झाल्यावर आपण एका वेगळ्याच विश्वात सफर करून आल्याचा भास होतो. आपल्या पूर्वजांनी सोसलेल्या अनन्वित छळाचा हा जळजळीत इतिहास आतापर्यंत आपल्याला माहीत कसा नव्हता याची लाजही वाटते.

पुस्तक- रजाकार

लेखक: बाबू गंजेवार

मूल्य: २५० ₹. / पृष्ठे- १४४

प्रकाशक: जटायू प्रकाशन, नांदेड

इतिहास

पुस्तक खरेदीसाठी संपर्क- ग्रंथ संवाद वितरण (8383888148)

Continue reading

श्री महालक्ष्मीचा महिमा सांगणारी ‘नारायणी’..

नारायणी, हा लेखक किशोर दीक्षित यांनी लिहिलेला लघुग्रंथ नुकताच हाती पडला आणि जाणून घेतले त्याविषयी.. आद्यन्तरहितेदेवी ह्यादिशक्ती खगोचरे।  योगिनी योगसंभूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।  लेखक किशोर दीक्षित आपल्या मनोगतात लिहितात- आज 'नारायणी' हा लघुग्रंथ आपल्या हाती देताना मनास खूप आनंद व समाधान वाटत...

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का?

तुम्ही सर्वोत्तम जीवन जगत आहात का? तुम्ही तुमच्या उद्देशाच्या दिशेने यात्रा करत आहात की त्यापासून दूर जात आहात? तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ते तसंच चालू ठेवून तुम्हाला स्वतःविषयीची हीच कथा चालू ठेवायची आहे की तुम्हाला वेगळ्या भवितव्याची अपेक्षा...

जाणून घ्या इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा!

इस्रोची विस्मयजनक अवकाशयात्रा, हे लेखक सुरेश नाईक यांचे विज्ञान पुस्तक. सचित्र वाचनीय असलेले हे पुस्तक  आर्ट पेपरवर छापलेले आहे. लेखक सुरेश नाईक यांनी या पुस्तकाबद्दल आपली भूमिका मांडली आहे. त्यातील काही भाग इथे देत आहोत. 'चंद्रयान-३'चे यश अतिशय गौरवास्पद होते आहे. याची...
Skip to content