शहरांचे उष्णतामान वाढते आहे आणि त्यासोबतच ग्रामीण भागातून आणि इतर ठिकाणांहून लोक शहरात काम मिळवण्यासाठी येतच राहणार. ताजे संशोधन असे सांगते की, यामधून शहरातील उंदरांची संख्या वाढत राहणार आहे. कुणी म्हणेल की यात नवीन ते काय सांगितले? शहराची लोकसंख्या वाढणार तशीच ती उंदरांचीही वाढणारच. परंतु जगात प्रथमच केल्या जाणाऱ्या या जागतिक पातळीवरील संशोधनात जो निष्कर्ष निघाला आहे तो समजून घेण्यासारखा आहे हे निश्चित. काळाच्या ओघात उंदरांची संख्या का आणि कशी वाढते आहे याचे विश्लेषण या संशोधनात केले गेले आहे.
श्री गणेशाचे वाहन असलेला उंदीर अतिशय बुद्धिमान, सहकार्य करण्यात तत्पर आणि प्रचंड लवचिकता असलेला प्राणी आहे. हा प्राणी मानवाच्या बरोबरीनेच उत्क्रांत झाला आणि त्याने स्वत:ची क्षमता कचरा आणि तत्सम इतर पदार्थांसोबत इतकी उत्तम रीतीने जुळवून अतिशय कमी जागेत स्वत:साठी निवासाचीही व्यवस्था करून घेतली. उंदीर हा प्राणी अनेक प्रकारचे रोगजंतू पसरवू शकतो, अन्नाची आणि गुरांच्या चाऱ्याची तसेच शेतातील धान्याचीही नासाडी करू शकतो. त्यासोबतच तो माणसाच्या घरात शिरला तर त्याला पकडणे हे प्रचंड हुशारीचे काम असते. तो चपळ आणि कुठेही लपू शकण्यात तरबेज असा प्राणी आहे. घरात घुसलेला उंदीर जोवर जिवंत अथवा मृत सापडत नाही तोवर घरातल्या लोकांना झोप लागत नसावी.

हे संशोधन जागतिक पातळीवरचे असल्यामुळे यासाठी जगातील काही मोजक्या शहरात गेली १२ वर्षे माहिती गोळा केली जात होती. यात शहरांचे तापमान कसे वाढत गेले इथपासून तर लोकसंख्या वाढ आणि शहरातील मोकळ्या जागा, बगीचे यांची संख्या यांचाही शोध घेतला गेला. ही माहिती गोळा करीत असताना एक नवीन गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे उंदरांच्या झुंडीच्या झुंडी निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण हवामान बदल आहे असे दिसून आले. शहरातील निवासी जनतेला उंदरांमुळे होऊ शकणारा रोगांचा संसर्ग आणि घरात शिरल्यानंतरचा मनस्ताप या दोन्हीची कल्पना असली तरी इलाज नसतो. विज्ञान प्रगती (Science Advances) या नियतकालिकासाठी लिहिलेल्या आपल्या अहवालात संशोधक जोनाथन रिचर्डसन आणि त्यांचा चमू म्हणते की या अभ्यासातून असेही दिसते की उंदरांची संख्या वाढत असलेली अशी इतर अनेक शहरे जगात असू शक्तील. या अभ्यासाबद्दल बोलताना तेल अव्हिव विद्यापीठाचे मेंदू वैज्ञानिक इनबाल बेन-आर्मी बार्ताल म्हणतात की, या अभ्यासातून विषयावर एक विहंगम दृष्टी टाकता येते आणि “शहरातील उंदीर हेच तेथील खरे मानवकल्याण समजावून सांगतात.”
संशोधकांच्या चमूला चकित करणारी गोष्ट म्हणजे ज्या शहरात हिरवळ आणि बगीचे कमी झाले तेथे उंदरांची संख्या वाढती दिसली. या अगोदरच्या आभासात असे दिसले होते की उंदरांना हिरवळ अतिशय प्रिय असते. वैज्ञानिक मुन्शी साऊथ यांच्या मते उत्तम बगीचे असतील तर उंदरांचे बस्तान बसत नाही कारण तेथे कचरा कमी असतो. मात्र व्यावसायिक जागा आणि निवासी प्रकल्प यांच्यात उंदरांना अधिक चांगली सोय मिळते आणि साहजिकच संख्या वाढू लागते. शहराचे नियोजन करणाऱ्यांनी यावर काही उपाय योजायला हवेत. त्यातला पहिला म्हणजे शहरातील कचरा नियमितपणे गोळा केला जाणे आणि त्यावर प्रक्रिया करणे हा आहे. त्याशिवाय उंदरांना इमारतीबाहेर कसे ठेवता येईल यासाठी काही ठोस पावले उचलावी लागतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरांना उंदरांच्या लोकसंख्यावाढीला आळा घालण्यासाठी निश्चित अशी वेगळी तरतूद करावी लागेल…