गेले दीड-दोन महिने ठाणे शहर आणि ठाणे पोलीस आयुक्तालायाच्या परिक्षेत्रात वाटेल तिथे उभ्या असलेल्या गाड्या खेचून (टोईंग) नेण्यावरून बिनकामाचे आंदोलन सुरु आहे. आश्चर्य म्हणजे या आंदोलनात सत्तारूढ राजकीय पक्षच आघाडीवर दिसत आहे. खरेतर या सर्व राजकीय पक्षांनी आंदोलनाच्या फंदात न पडता गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही गोष्ट सांगितली असती तर चुटकीसरसा निर्णय झाला असता. परंतु तीन-चार महिन्यांवर आलेल्या महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता राजकीत पक्ष बिनपैशाचा ‘तमाशा’ करत असल्याची भावना जनतेच्या मनात आहे. पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी पूर्वी केलेल्या काही चुकांमुळे वाटेल तिथे उभ्या केलेल्या वाहनांना खेचून नेण्याला जनतेचा थोडासा विरोध आहे. कारण सर्वसामान्यांच्या वाहनांना एक न्याय व महत्त्वाच्या व्यक्ती वा ओळखीच्या दुकानदाराचा माल उतरवणाऱ्या ट्रकला दुसरा न्याय, हे जनतेला मान्य नाही. गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेल्या आंदोलनाला उद्देशून पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे व उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी स्पष्ट शब्दात जनतेला आश्वासन दिले आहे की, ‘जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. सर्वाना समान न्याय देणार. सामान्यांना घरबरण्याचे कारण नाही.’ असे आश्वासन देऊनही आंदोलक बधत नाहीत. याचाच अर्थ आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. मनोरंजक तितकीच संतापजनक बाब म्हणजे आतापर्यंत कुणावरही कारवाई केलेली नसताना ‘अगा जे घडलेची नाही, त्याची वार्ता पुसशी काई..’ यातलाच हा प्रकार वाटतो.
शिस्तही कुणालाच नकोअसते
खरंतर कुठलीही शिस्त (आपलं घरही त्याला अपवाद नाही ) कुणालाच नको असते. त्यातही ज्येष्ठ राजकीय नेते व समाजधुरीणांनी ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण तसेच बदलापूर शहरात गर्दीच्या वेळी वा संध्याकाळी फेरफटका मारून या वाहनांनी तसेच बेशिस्त बाईकस्वारांनी (यात स्कुटीही आल्या) तसेच आलिशान गाड्यांनी रस्त्यांवरून चालणे नागरिकांना अशक्य करून सोडलेले आहे. त्यातच ज्या रस्त्यावरून वा पदपथावरुन बिनधास्त चालताच येत नाही त्या रस्त्यांवर ठाणे शहरात तर कोपऱ्याकोपऱ्यावर पदपथावरुन बाईक जाताना दिसतात. समोरून-मागून-बाजूने कुठूनही येऊन ते आपली हाडे खिळाखिळी करू शकतात. टेम्बी नाक्यावर वा ग्रन्थसंग्रहलयाच्या खाली बसथांब्यावर उभं राहणे सामान्य नागरिकांना नकोसे झालं आहे. ‘काका बघता काय, जरा बाजूला सरका ना!’ असं निर्लज्जपणे सांगताना उच्चशिक्षितांनाही लाजा वाटत नसतील तर बाकीच्यांचे काय? ते तर सरळ अंगावरच बाईक घालतात आणि वर आवाज चढवून बोलतात ‘लगा तो नहीं ना?’ असल्या टारगटांना पोलिसांनी काठ्यांनी बडवायलाच हवे. पण अशावेळी नेमके पोलिसदादा नसतात.
खाऊगल्लीतही तोच प्रकार
ठाणे शहरात जवळजवळ प्रत्येक नाक्यावर खाऊगल्ली आहे. म्हणजे प्रत्येक नाक्यावर एक-दोन-तीन लाईन्समध्ये गाड्या पार्क केलेल्या असतात. उदाहरण म्हणून कॅसल मिलचा चौक घ्या. त्याला मीनाताई चौक असे म्हणतात. तेथे जी हॉटेल व टपऱ्या आहेत तेथील पदपथावर प्रवेश मिळवून दाखवा हे आव्हान आहे. येथे तर नेहमीच तीन लाईनीत पार्किंग केलेलं असते. तसेच उथळसरहूनही एक रस्ता येथे येऊन मिळतो. येथे तर पोळीभाजी, शाकाहारी / मांसाहारी जेवण मिळणारी ठिकाणं आहेत. ही सर्व इमारतीत आहेत. परंतु हे खाद्यपदार्थ घेऊन जाणारी समस्त मंडळी जवळजवळ पाऊण रस्ता दररोज अडवून ठेवतात. खाद्यपदार्थ घेण्याबाबत काही तक्रार नाही. परंतु गाडीवरच बसून घरी फोन करून पदार्थांची लिस्ट ठरवणारे हे उच्चशिक्षितच असतात. ‘बेबी आज हे नाही, अंडाकरी आहे’ वगैरे विचारण्याचं हे ठिकाण आहे काय? घरून निघताना मेनू फिक्स केला नव्हता का? अशी जवळजवळ 300 ठिकाणं ठाण्यात आहेत.
वाहतूक कशी सुरळीत व लगेच सुरु होईल?
ठाण्यातील अनेक भागात वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत तेथेही शाळा भरताना व सुटताना वाहतूककोंडी ठरलेलीच असते. काही शाळा तर आंतरराष्ट्रीय आहेत. परंतु तेथेही शाळा भरताना व सुटताना पालकवर्ग आपल्या गाड्या व स्कुटी वाट्टेलतशा पार्क करून वाहतुकीस अडथळाच आणत असतात. आडव्या, उभ्या, सरळ अशा कशाहीप्रकारे गाड्या पार्क केलेल्या असतात. बरं.. यापैकी काहींचे पालक तर उच्च अधिकारीही असतात. या सर्वांना तो बापुडा शाळेचा सुरक्षा कर्मचारी काय सांगणार? राबोडी नाक्यावर असलेल्या एका मिशनरी शाळेसमोर तर अगदी चिंचोळा रस्ता आहे. या शाळेकडे आतल्या बाजूला मोठी जागाही आहे. रस्त्यालगत मोठे पटांगणही आहे. पण विद्यार्थ्यांना, पालकांना होणारा त्रास लक्षात घेता तीन फूट जागा सोडायलाही शाळा तयार नाही. म्हणे आम्ही मिशनरी…

रुग्णालये, मॉलची बदमाशी!
ठाणे शहरात तसेच आसपासाच्या भागात छोटी नर्सिंग होम्स, रुग्णालये तसेच डी मार्ट व इतर मॉल यांची रेलचेलच आहे आणि हे सर्व रस्त्याच्या कडेलाच असतात. छोट्या नर्सिंग होम्सबाबत जास्त तक्रारी नाहीत. मात्र रुग्णालये व मॉलबाबत बऱ्याच तक्रारी आहेत. बहुतेक सर्व रुग्णालये व मॉल नव्या इमारतीत असतात. येथे पार्किंगची सुविधा नसेल तर इमारतीचा प्रस्तावच संमत होत नाही. असे असतानाही अनेक रुग्णालयांत रीतसर पार्किंग उपलब्ध नसते. कारण, त्यांच्या व्यवस्थापनाने तेथे गोदामे, स्टोअर रूम्स आणि प्रयोगशाळा निर्माण केलेल्या असतात. मग अशावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना वा कधी इतर डॉक्टर्सना आपल्या गाड्या हमरस्त्यावर पार्क कराव्या लागतात. तरीही पार्किंगची एक लाईन असेल तर आम्ही कारवाई करत नाही. परंतु मानपाडा, पाटलीपाडा, कासारवडवली येथील वाहतूककोंडी लक्षात घेता कारवाई करावी लागते. तीच गोष्ट डी मार्टची… यांनी तर आपल्या पार्किंग स्लॉटमध्ये खुशाल गोदामे तयार केले आहेत. उरलेल्या जागेत बेसुमार सामान आणून ठेवतात व ग्राहकांच्या गाडयांना पार्क करण्याससाठी रस्ता दाखवतात, अशी माहिती देऊन एक अधिकारी म्हणाला की, अशा गोष्टींवर राजकीय नेते वा समाजकार्यकर्ते काहीच बोलत नाहीत. तीच गोष्ट गोखले रोड व राममारुती रोडवरील दुकानदारांची आहे. बहुतेक दुकाने नव्या इमारतीत आहेत. तेथे पार्किंगही असते. परंतु ही मंडळीही त्याचा वापर सामान ठेवण्यासाठी करतात. या दुकानात काम करणारे 80 टक्के माणसे रेल्वेने येतात. तरी या सर्व दुकानांसमोर बाईक वा स्कुटर्सची भली मोठी रांग कशी दिसते, याचीही चौकशी झाली पाहिजे. या जवळजवळ सर्वच दुकानदारांनी आपल्या दुकानासमोरील पदपथ व मोकळी जागा बळाकवलेली दिसते. राजकीय मंडळी या सर्वांना नियमाप्रमाणे वागा असे सांगणार आहेत का?
सेवा रस्त्यावरील गाडी शोरूम
ठाणे शहरातील सर्वच सेवा रस्ते एक तर फेरीवाल्यांनी व जुन्या नव्या गाड्यांच्या शोरूमनी लाटलेले आहेत. शिवाय तेथे दोन्ही बाजूला पार्किंग ढापलेले आहे. जाताजाता ढोकाळी नाक्यानजिक एक देशी बार व दुसरा रेग्युलर बार यांनी तसेच असजूबाजूच्या छोट्या दुकानदारांनी पदपथच ढापला आहे. खरंतर ही नवी इमारत आहे. संताजनक बाब म्हणजे रस्तारुंदीकरण झाल्यावर या दोघांनी अर्धा रस्ता व्यापला आहे. “Discipline without freedom is tyranny. Freedom without discipline is Chaos” हे टोईंगविरोधकांनी लक्षात घेतले तर अनेक समस्या सुटायला मदतच होईल. पण त्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांनी आपल्या आततायी अनुयायांना आवरायला हवे व पोलिसांना पाठिंबा दिला पाहिजे.
या फोनकॉल्सची चौकशी हवी
दरम्यान, टोईंगबाबतची माहिती घेण्यासाठी संबंधित विविध कार्यालयामध्ये जात असताना काही अधिकारी व एका तथाकथित समाजकार्यकर्त्यात झालेल्या फोन कॉल्सबाबत उलटसुलट चर्चा कानावर येत हॊती. सरकार दरबारी तसेच प्रशासकीय बाबी निपटल्यानंतर टोईंगप्रकरणी गाडयांना कंत्राट देऊ नका. आपण भेटू व काही रक्कम ‘फिक्स’ करू. टोईंगची गाडी केवळ कागदावर राहील, इतकेच करायचे. तुमच्याकडे ‘अर्थपूर्ण’ पहिले जाईल व काळजीही घेतली जाईल, अशा आशयाचे किमान पाच/सहा फोनकॉल्स वाहतूक पोलीस खात्यात आल्याचे माहितीगारांनी सांगितले. असे जर काही फोनकॉल्स आले असतील तर आयुक्तांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींना समजापुढे उभे करावे, अशी आमची मागणी आहे. पोलिसांनाच पैसे देऊन गप्प करण्याचा हा प्रकार गंभीर आ.हे हा तथाकथित समाजसेवक कोण आहे हे ठाणेकरांना समजले पाहिजे. कारण, ही कीड वेचून ठेचायलाच हवी. हे ‘डील’ होत नाही याची खात्री झाल्यावरच टोईंगविरोधी आंदोलन सुरु झाल्याचे सूत्रांनी सूचित केले. म्हणूनच या फोनकॉल्सची चौकशी होणे गरजेचे आहे. तेव्हाच हा बिनपैशाचा राजकीय ‘तमाशा’ थांबेल!
छायाचित्रः प्रवीण वराडकर