ग्रीस येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झिम्बाब्वेची माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तसेच झिम्बाब्वेच्या माजी क्रीडामंत्री, ४१ वर्षीय कस्टी कॉवेन्ट्री यांनी बाजी मारून झिम्बाब्वेची क्रीडा विश्वात मान उंचावली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कस्टी यांनी या विजयाबरोबरच काही नव्या विक्रमालादेखील गवसणी घातली आहे. जागतिक क्रीडा संघटनांवर नियंत्रण असणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत. तसेच या पदावर आफ्रिकी देशातील व्यक्तीची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या समितीच्या त्या १०व्या अध्यक्षा असून आतापर्यंतच्या सर्वात तरुण अध्यक्ष कस्टी ठरल्या आहेत. क्रीडा विश्वातील या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत एकूण ७ उमेदवार रिंगणात होते. परंतु पहिल्याच फेरीत त्यांनी जिंकण्यासाठी आवश्यक असलेली ४९ गते मिळवून आपल्या इतर ६ प्रतिस्पर्ध्याना गारद केले.
या समितीच्या ९७ सदस्यांनी मतदानात भाग घेतला होता. कस्टी आणि दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या जुआन अंतोनिओ समारांच यांच्यात तब्बल २१ मतांचा फरक होता. समारांच यांना अवधी २८ मते मिळाली तर ब्रिटनचे माजी नामवंत अॅथलेट सबॅस्टीयन को तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना अवघी ८ मते मिळाली. प्रिन्स अल हुसेनी हे राजघराण्यातील बडे उमेवार अवघे २ मते मिळवू शकले. को हे आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाचे अध्यक्ष आहेत तर समारांच यांचे वडील याअगोदर २ वेळा अध्यक्षपदी होते. कस्टी यांनी तब्बल ५ ऑलिम्पिक स्पर्धांत झिम्बावेसारख्या छोट्या देशाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी ५ ऑलिम्पिक स्पर्धांत २ सुवर्ण, ४ रौप्यआणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. २००४च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यांनी आपले पहिले सुवर्ण २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत मिळविले. मग त्याचीच पुनरावृत्ती कस्टी यांनी २००८च्या बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतदेखील केली. जागतिक स्पर्धेतदेखील त्यांच्या नावावर पदकांची नोंद आहे. आफ्रिकी देशात ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम कस्टी यांच्या नावावर जमा आहे.

येत्या २३ जूनला त्या अध्यक्षपदाची सूत्रे विद्यमान अध्यक्ष जर्मनीचे थॉमस बाक यांच्याकडून स्वीकारतील. कस्टी यांचे हे यश मावळते अध्यक्ष बाक यांचे मानले जात आहे. १३१ वर्षांची मोठी परंपरा या अध्यक्षपदाला लाभली आहे. निवडणूकीपूर्वी कस्टी अध्यक्ष होतील असा अंदाज कोणीच बांधला नव्हता. पण त्यांनी ही निवडणूक जिंकून आपण खेळाबरोबरच एक मुत्सद्दी राजकारणी असल्याचे दाखवून दिले. माजी अध्यक्ष थॉमस बाक यांच्या विचारांचा कस्टी यांच्यावर मोठा पगडा आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या इतर उमेदवारांप्रमाणेच त्यांनी आपला पीआरओ म्हणून कोणी ठेवला नाही. इतर देशात प्रचारासाठीदेखील फारशा त्या गेल्या नाहीत. मात्र त्यांनी आपल्या पतीच्या सहकार्याने आपला उत्तम जाहिरनामा तयार केला, जो ऑलिम्पिक खेळाचा विकास साधणारा होता. तोच त्यांनी सर्व मतदारांना पाठवून त्याचा सतत पाठपुरावा केला. अखेर त्याचाच फायदा निवडणुकीत कस्टी यांना झाला. एक उत्तम खेळाडूबरोबरच उत्तम संघटक, राजकारणी आणि मुत्सद्दीपणा याची छान छाप या निवडणुकीत कस्टी यांनी पाडली.
झिम्बाब्वेची राजधानी हरारे येथील कॉन्व्हेट शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी कस्टी अमेरिकेत गेल्या. तेथेच त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. अलबामा ऑर्बन विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. तेथेच त्या चांगल्या जलतरणपटू म्हणून नावारुपाला आल्या. वयाच्या अवध्या १७व्या वर्षी त्यांनी सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण केले. त्यानंतर सातत्यपूर्ण कामगिरी करत आणखी ४ ऑलिम्पिकमध्ये कस्टी सहभागी झाल्या. झिम्बाब्वेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांनी त्यांना “गोल्डन गर्ल” अशी उपाधी दिली. तसेच १ लाख अमेरिकन डॉलर्स बक्षिसही दिले. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी देशात बदल घडवण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच मिळालेली सर्व रक्कम धर्मदाय संस्थेला मदत म्हणून देऊन टाकली. २०१६च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर कस्टी यांनी जलतरणाला अलविदा करुन थेट राजकारणात उडी घेतली.

पाण्यात पडले की आपोआपच पोहोता येते, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. खेळाप्रमाणेच राजकारणात त्या यशस्वी ठरल्या. २०१८मध्ये एमरसन यांच्या मंत्रिमंडळात त्या क्रीडामंत्री म्हणून प्रथमच सामील झाल्या. मार्च २०२४पर्यंत त्या क्रीडामंत्री म्हणून राहिल्या. ऑलिम्पिक समितीशी तसा त्यांचा २०१२पासून संबंध आहे. आंतरराष्ट्रीय समिती खेळाडू आयोग निवड समितीच्या त्या ८ वर्षे सदस्य होल्या. त्यानंतर २०१८मध्ये त्या अॅथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षा होत्या. गेली ८ वर्षे त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्याच सदस्या आहेत. २०२३मध्ये त्यांची कार्यकारिणी समितीत निवड झाली. २०२३मध्ये आंतरराष्ट्रीय जलतरण महासंघाने कस्टी यांची “हॉल ऑफ फेम”मध्ये निवड करून त्यांच्या या खेळाचा उचित गौरव केला. झिम्बाब्वे सरकारने खेळाडू असताना त्यांची “राष्ट्रीय संपत्ती” म्हणून घोषणा केली होती. २०३३पर्यंत तब्बल ८ वर्षे आता कस्टी अध्यक्षपद भूषवतील.
भावी काळात कस्टी यांची खरी कसोटी लागणार आहे. कारण, अनेक प्रश्न क्रीडा विश्वाला भेडसावत आहेत. त्यामधील खेळाडूंमध्ये उत्तेजक सेवनाचे वाढते प्रमाण, ट्रान्सजेंडर महिला खेळाडूंबाबतच्या प्रश्नाबाबत मोठा निर्णय घ्यावा लागेल. तसेच डोपिंग, विविध देशांच्या क्रीडा संघटनांमधील वाढता भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न, नव्या खेळांचा समावेश, भागीदार, प्रायोजक या सर्वांशी सुसंवाद कस्टी यांना साधावा लागणार आहे. तसेच ऑलिम्पिक स्पर्धांचे उन्हाळी आणि हिवाळी या दोन्हीचे आयोजनाचे शिवधनुष्य त्या कसे पेलतात हेपण बघणे महत्त्वाचे ठरेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सुसंवाद साधताना त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीची खरी कसोटी लागेल. आगामी ऑलिम्पिक २०२८मध्ये अमेरिकेतल्या लॉस एंजलिस येथे होणार आहे. तेथे खेळाडूंच्या बंदीच्या प्रश्नाचा मोठा गुंता कस्टी यांना सोडवावा लागणार आहे. कारण, ट्रम्प सरकार सर्वच देशातील खेळाडूंना येथे सहभागी होण्यासाठी परवानगी देणार नाही. आपल्या कारकीर्दीत त्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा कारभार कसा चालवतात आणि जागतिक क्रीडा विश्वाला कोणती नवी दिशा देतात ते बघणे महत्त्वाचे ठरेल.
